संगीत थेरपीचा प्रचार हवा तसा झाला नाही - मंजुषा राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:27 PM2020-01-12T12:27:01+5:302020-01-12T12:27:12+5:30
विशेष मुलांवर उपचाराची संगीतात ताकद
विहार तेंडूलकर
संगीतामध्ये खूप मोठी ताकद आहे, जी अजून आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही. संगीत मेंदूचा विकास घडवते, आकलनशक्ती, होकारार्थी मानसिकता वाढवते. केवळ सामान्यच नव्हे तर विशेष मुलांवरही या संगीताव्दारे उपचार करता येतात. पण अजूनपर्यंत ‘म्युझिक थेरपी’चा प्रचार आणि प्रसार झालेला नाही, अशी खंत संगीत विशारद आणि विशेष मुलांसाठी म्युझिक थेरपीच्या माध्यमातून काम करणाऱ्या मंजुषा राऊत (औरंगाबाद) यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
प्रश्न : म्युझिक थेरपीची संकल्पना तुमच्या मनात कशी आली?
उत्तर : मी एका दिव्यांगांच्या शाळेत भेट द्यायला गेले होते, त्यावेळी तेथील विशेष मुले ही सीडीवर गाणी ऐकताना दिसली. त्यावेळी मी घरी येऊन विचार केला, संगीत विशारद तर मी होतेच; त्यामुळे या विषयात काम करणे सोपे होते. मी या विषयाच्या अंतरंगात गेले आणि त्यावेळी मला खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या.
प्रश्न : म्युझिक थेरपी ही कशाप्रकारे काम करते?
उत्तर : म्युझिम थेरपीमध्ये एक महत्वाचं तत्व लक्षात ठेवलं पाहिजे ते म्हणजे मुलांसमोर नुसतं गाणं म्हणणं वा त्याला नुसतं ऐकायला लावणं, हे अपेक्षित नाही तर यामध्ये त्या मुलाचा प्रत्यक्ष सहभाग असणं महत्वाचं. त्या मुलाच्या वैचारिक पातळीवर जाऊन विचार केला पाहिजे आणि त्यापध्दतीने त्याच्या बौध्दीक पातळीला झेपेल असे सोपे आणि चांगले संगीत ऐकवले गेले, त्याला संगीताच्या तालावर नाचायला, डोलायला शिकवले तर त्याच्यावर जास्त परिणाम करू शकते.
थेरपीचे फायदे
विशेष मुलेच असं नाही तर एक सामान्य मूलही संगीताला जास्त प्रतिसाद देतात. कारण संगीत ही बाब अशी आहे की ती मेंंदूपर्यंत थेट पोहोचते. त्यामुळे ४ ते ५ वर्षांपर्यंत मुलांना गाण्यांच्या माध्यमातून जर एखादी बाब शिकवली गेली तर त्यांची भाषा सुधारेलच; शिवाय त्यांचा पूर्ण बौध्दीक विकास होईल.
मुले अन् थेरपी
विशेष मुलांमध्ये कोणतीही बाब ग्रहण करण्याची आणि ती बाब लक्षात ठेवण्यासाठीच्या पेशी कमकुवत असतात, मृत असतात. त्यामुळे उर्वरित पेशीवर ताण येतो. म्युझिक थेरपी या कमकुवत पेशींना सशक्त करतं, जागृत करतं. पण हे सगळं टप्प्याटप्प्याने आणि जसजसा मुलांचा विकास होतो, तसतसं करणं गरजेचे आहे.
४ ते ५ वर्षांपर्यंत मुलांना गाण्यांच्या माध्यमातून जर एखादी बाब शिकवली गेली तर त्यांची भाषा सुधारेल. - मंजुषा राऊत