ग्रामसेवकांच्या पदोन्नत्या पुन्हा रखडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:17 AM2021-05-21T04:17:44+5:302021-05-21T04:17:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून ग्रामसेवकांच्या ग्रामविकास अधिकारी पदी होणाऱ्या पदोन्नत्या रखडल्या आहेत. स्थायी समितीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून ग्रामसेवकांच्या ग्रामविकास अधिकारी पदी होणाऱ्या पदोन्नत्या रखडल्या आहेत. स्थायी समितीच्या सभेत या संदर्भात आक्रमकपणे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, त्यावेळी लवकरच या पदोन्नत्या करण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र आठवडा उलटूनही या कामाला अद्यापही सुरुवात झाली नसल्याने ग्रामपंचायत विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
ग्रामसेवकांच्या ग्राम विकास अधिकारी तर ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या विस्तार अधिकारीपदी पदोन्नती करण्याची प्रक्रिया रखडली आहे. गेल्या काही महिन्यापासून याची मागणी असतानाही प्रशासकीय पातळीवर या प्रक्रियेला विलंब होत आहे. अद्यापही काही तालुक्याची माहिती ग्रामपंचायत विभागाला प्राप्त नसल्याचे समजते. दरम्यान, स्थायी समितीच्या सभेत याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, त्यावेळी आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे यांनी दिले होते. मात्र आठवडा उलटला तरी अद्याप प्रक्रिया सुरू नसल्याची महिती आहे. रावेर तालुक्यातील ग्रामसेवकांची माहिती अद्याप बाकी असून ती आल्यानंतरच प्रक्रियेला सुरवात होणार असल्याचे बाळासाहेब बोटे यांनी सांगितले.
आरोग्य सेवकांच्या पदोन्नत्यांना अद्यापही मुहूर्त नाही
आरोग्य विभागातच अनेक पदे रिक्त असल्याने पदोन्नत्या रखडल्या आहे. वरिष्ठ पातळीवर हालचाली होत असतानाही आरोग्य विभाग आतूनच प्रकरण पुढे जात नसल्याने पदोन्नत्या होत नसून गेल्या चार वर्षापासून ही प्रक्रिया झालेली नाही. वरिष्ठ पातळीवर आदेश देऊनही अद्यापही या प्रक्रियेला पूर्णतः सुरुवात नाही. याबाबतही विविध सभांमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. लवकरच ही प्रक्रिया करण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिले होते ,मात्र अद्यापही ठोस पावले उचलली नाहीत.