गाळेधारकांनी धुडकावला मनपाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:12 AM2021-06-19T04:12:27+5:302021-06-19T04:12:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपा प्रशासनाने गाळेधारकांना थकीत भाडे भरण्याचा दिलेला प्रस्ताव गाळेधारक संघटनेने फेटाळून लावला आहे. प्रशासन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा प्रशासनाने गाळेधारकांना थकीत भाडे भरण्याचा दिलेला प्रस्ताव गाळेधारक संघटनेने फेटाळून लावला आहे. प्रशासन व शासनाकडून जोपर्यंत ठोस आश्वासन दिले जाणार नाही, तोपर्यंत गाळेधारकांचे आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका गाळेधारकांनी घेतली आहे, तसेच गाळेधारकांच्या न्याय व हक्कासाठी थेट मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची तयारी गाळेधारकांनी सुरू केली असल्याची माहिती गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनी दिली आहे.
मनपा प्रशासनाने गाळेधारकांना गेल्या अनेक वर्षांपासून थकीत असलेले भाडे भरण्याचा सूचना दिल्या आहेत, तसेच ही रक्कम न भरल्यास गाळे जप्त करण्याचा इशारा दिला आहे. त्या विरोधात शहरातील १६ अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांनी १५ पासून मनपाविरोधात साखळी उपोषण पुकारले आहे. याबाबत तोडगा निघावा म्हणून गुरुवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती, तसेच थकीत भाडे भरण्याचा सूचना दिल्या होत्या. याबाबत शुक्रवारी गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत डॉ.शांताराम सोनवणे, पांडुरंग काळे, राजस कोतवाल यांच्यासह इतर मार्केटमधील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. प्रशासनाने दिलेला प्रस्ताव गाळेधारकांना मान्य नसल्याचे सांगत, आंदोलन पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
आंदोलनाला भाजपचा पाठिंबा
गाळेधारक संघटनेतर्फे पुकारलेल्या बेमुदत साखळी उपोषणाचा चौथा दिवस होता. शुक्रवारी माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे यांनी भेट दिली. या आधीही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला भेट देऊन, आपला पाठिंबा दिला आहे, तसेच शुक्रवारी उपोषणस्थळी गाळेधारकांनी थाळीनाद आंदोलन केले. या आंदोलनात भोईटे मार्केटचे सुजीत किनगे, अविनाश भोळे, रमेश सूर्यवंशी, हर्षा बोरोले, सुरेंद्र चव्हाण उपस्थित होते. जळगाव शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्याम तायडे, दिलीप पाटील, सागर सपके यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला, तसेच हिंदू महासभा प्रदेश उपाध्यक्ष ॲड.गोविंद तिवारी व युवा अध्यक्ष पंडित तिवारी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.
पुढील आठवड्यात गाळेधारकांकडून मागविले जाणार प्रस्ताव
एकीकडे गाळेधारकांच आंदोलन सुरू असताना, दुसरीकडे मनपा प्रशासनानेही कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. महासभेच्या ठरावानुसार अंमलबजावणीसाठी कार्यक्रम निश्चित झाला असून, पुढील आठवड्याभरात संपूर्ण रूपरेषा निश्चित करून जुलै महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात मनपाकडून गाळेधारकांचे नूतनीकरणासाठी प्रस्ताव मागविले जाणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.