कर्तव्यावर नसलेल्या सहा डॉक्टरांच्या बडतर्फीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 11:55 AM2020-06-03T11:55:53+5:302020-06-03T11:56:07+5:30
सीईआेंचा दणका : तीन दिवसांत हजर न झाल्यास निलंबन
जळगाव : कोविड रुग्णालयात कर्तव्यावर नसणाऱ्या सहा डॉक्टरांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात आला असून तीन दिवसात ते हजर न झाल्यास स्थानिक पातळीवरच त्यांचे निलंबन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे सीईओ तथा कोरोना रुग्णालयाचे प्रशासक डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी दिला आहे़ डॉ़ पाटील यांनी कोरोना रुग्णालयात भेट देऊन सर्व रुग्णालय पिंजून काढले़
सीईओ डॉ़ पाटील यांच्यासह अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ़ किरण पाटील उपस्थित होते.सेंट्रल आॅक्सिजन सीस्टीमची पाहणी केली़ आयसीयूतील तीस बेडसाठी ही यंत्रणा कार्यान्वयीत आहेच अन्य बेडसाठीही सांयकाळपर्यंत ती पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले़ पाहणीदरम्यान, सहा डॉक्टर कर्तव्यावर नव्हते तर दोन डॉक्टर वैद्यकीय रजेवर गेले़ या डॉक्टरांना तीन दिवसात हजर होण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आल्या आहेत़ शिवाय त्यांच्या बडतर्फीचा प्रस्तावही शासनाकडे पाठविला आहे़ तीन दिवसात ते हजर न झाल्यास त्यांना निलंबीत करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे़
रुग्णांनी लवकर समोर येणे गरजेचे आहे़ सर्व ग्रामपंचायतींना पत्रही देण्यात आले आहे़ अशा आजारी रुग्णांची लवकरात लवकर आहे त्या ठिकाणी तपासणी व्हावी, असे डॉ़ बी़ एऩ पाटील म्हणाले.
कंट्रोल रुमद्वारे नियंत्रण... प्रशासकीय यंत्रणेत समन्वय तसेच वैद्यकीय सेवेसाठी कोविड रुग्णालयात एक कंट्रोल रुम कार्यान्वयीत करण्यात येणार आहे़ यात कक्ष अधिकारी, डेटा एंट्री आॅपरेटर्स, अभिंयता अशी टीम राहणार आहे़ मंत्रालयलयीन कंट्रोलरूसारखे याचे स्वरूप राहणार आहे़ यासह मेडीकल ट्रीटमेंटसाठी असलेल्या प्रोटोकॉलसाठी एक टीम असेल, रुग्ण आल्यानंतर ही टीम प्रोटोकॉल सांगेल व त्यानुसार उपचार होतील व मृत्यूचे प्रमाणही रोखता येतील़