मराठा समाजाविरोधात मोर्चासाठी संघाचा होता प्रस्ताव - वामन मेश्राम
By admin | Published: January 12, 2017 12:29 AM2017-01-12T00:29:03+5:302017-01-12T00:29:03+5:30
जळगाव : कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेनंतर मराठा समाजातर्फे मूकमोर्चे काढण्यात येत होते.
जळगाव : कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेनंतर मराठा समाजातर्फे मूकमोर्चे काढण्यात येत होते. मराठा समाजाविरोधात दलितांनी मोर्चे काढावे, त्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक रसद पुरविण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्याचा खळबळजनक आरोप बहुजन क्रांती मोर्चाचे राज्य संयोजक प्रा.वामन मेश्राम यांनी केला. बहुजनांचे लाखोंचे मोर्च राज्यभरात निघत असल्याने ओबीसींना सुखावण्यासाठी मागणी नसताना ओबीसी मंत्रालयाची घोषणा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील विचारमंचावर भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सपकाळे, भुसावळचे नगरसेवक राजू सुर्यवंशी, रिपाईचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे, माजी उपमहापौर करीम सालार, समाजवादी पक्षाचे मुफ्ती हारून नदवी, किशोर सूर्यवंशी, चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास विसावे, जनसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे, बाळासाहेब सैंदाणे, सुरेश सोनवणे, गोपाल ठाकूर, अशोक लाडवंजारी, डॉ.मिलिंद बागुल, अॅड. राजेश झाल्टे, राजू मोरे सागर सपके व विविध जाती-धर्माचे मान्यवर उपस्थित होते.
बहुजनांचा स्वत:च्या ताकदीवर मोर्चा
अहमदनगरमध्ये काढलेल्या बहुजन क्रांती मोर्चासाठी एक कोटी 67 लाखांचा खर्च झाला. त्यासाठी आम्ही कुणाकडूनही एक रुपया घेतला नाही. गावागावात नागरिकांना कुपन दिले. तसेच मोर्चाला येताना शिदोरी सोबत आणण्याची सुचना केली. बहुजनांचे पैसे, कौशल्य आणि परिश्रम यामुळे स्वत:च्या ताकदीवर हे मोर्चे काढले. स्वाभिमान व स्वावलंबनासाठी मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाच्या मोर्चानंतर दलितांनी मोर्चे काढू नये असे काही नेत्यांनी सांगितले होते. मात्र बहुजन बांधव लाखात एकत्र आला आणि त्यांनी नेत्याचे म्हणणे नाकारले. जनतेला आता नेत्यांची गरज नाही असा संदेश या मोर्चाच्या निमित्ताने गेला आहे.