विद्युत खांब काढण्याचा प्रस्ताव तब्बल तीन महिने पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:16 AM2021-05-26T04:16:10+5:302021-05-26T04:16:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील ५० हजार नागरिकांसह जळगाव, चोपडा व यावल तालुक्यातील नागरिकांना शहरात येण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ...

The proposal to remove the power pole fell three months later | विद्युत खांब काढण्याचा प्रस्ताव तब्बल तीन महिने पडून

विद्युत खांब काढण्याचा प्रस्ताव तब्बल तीन महिने पडून

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील ५० हजार नागरिकांसह जळगाव, चोपडा व यावल तालुक्यातील नागरिकांना शहरात येण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. पुलाच्या कामाला अडथळा ठरणारा विद्युत खांब हटवण्याचा ठराव फेब्रुवारी महिन्यात होऊन देखील मनपा प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव तब्बल तीन महिने उशिराने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला असल्याने या पुलाच्या कामाला उशीर होत आहे.

१८ महिन्यांत या पुलाचे काम होणे अपेक्षित असताना, आता २६ महिने होऊन देखील पुलाचे काम अद्यापपर्यंत होऊ शकलेले नाही. पुलाच्या कामाला पुलालगत असलेले महावितरणचे विद्युत खांब मुख्य अडथळा ठरत आहेत. हे विद्युत खांब काढण्याचे काम महावितरणकडे देण्यात आले होते. मात्र, महावितरणकडे निधी नसल्याने हे काम रखडले होते. शिवाजीनगर उड्डाणपूल हा महापालिकेच्या हद्दीत असल्याने पुलाच्या कामाला होणाऱ्या उशीरामुळे महापालिका प्रशासनाने मुख्यमंत्री निधी अंतर्गत महापालिकेला प्राप्त झालेल्या २५ कोटी रुपयांपैकी शिल्लक दीड कोटी रुपयांच्या निधीतून हे काम करण्याचा निर्णय घेतला.

ठराव झाला फेब्रुवारीत, प्रस्ताव पाठविला ३० एप्रिलला

विद्युत खांब मनपाच्यावतीने काढून घेण्याचा ठराव ३ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या महासभेत मंजूर करून घेण्यात आला. या ठरावावर महापौरांची स्वाक्षरी झाल्यानंतर तत्काळ पुढील प्रक्रियेसाठी हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणे गरजेचे होते. मात्र, तब्बल तीन महिने हा ठराव मनपा आयुक्तांकडे पडून होता. तब्बल तीन महिन्यानंतर म्हणजे ३० एप्रिल रोजी पालिकेने विद्युत खांब हटविण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला असल्याची माहिती मिळाली आहे. जर हा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यातच पाठविला गेला असता तर कदाचित विद्युत खांब हटवण्याच्या कामाला सुरुवात झाली असती. केवळ मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या पुलाचे काम रखडत असल्याचा आरोप नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केला आहे.

५ लाख नागरिकांना बसतोय फटका

दोन वर्षांपूर्वी शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम सुरू झाले आहे. या कामामुळे शिवाजीनगर भागातील नागरिकांसह जळगाव, यावल व चोपडा तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. आधीच पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यातच आता पूर्णपणे काम थांबल्यामुळे या पुलाचेही काम पूर्ण होण्यास अजून वर्षभराचा काळ जाणार आहे. त्यामुळे ५ लाख नागरिकांना अजून काही महिने त्रास सहन करावा लागणार आहे. जूनपर्यंत हे काम होणे अपेक्षित होते. मात्र, आता विद्युत खांब काढण्याच्या कामाला अजूनही सुरुवात न झाल्यामुळे थांबल्यामुळे ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कोट..

शिवाजीनगर भागातील नागरिकांचा अंत पाहू नका

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला आधीच मोठ्या प्रमाणावर उशीर झाला आहे. त्यात मनपा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विद्युत खांब हटवण्याचा प्रस्ताव उशिराने पाठवला गेला आहे. त्यामुळे हे काम लांबत आहे. यामुळे शिवाजीनगरवासीयांसह जळगाव, यावल व चोपडा तालुक्यातील नागरिकांनादेखील यामुळे फटका बसत आहे. प्रशासनाने शिवाजीनगरमधील नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये.

-सुरेश भोळे, आमदार

विद्युत खांब हटविण्याबाबतचा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यातच महासभेने मंजूर केल्यानंतर आयुक्तांनी हा प्रस्ताव तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणे गरजेचे होते. मात्र, तीन महिने आयुक्तांनी हा प्रस्ताव महापालिकेतच धूळ खात पडू दिला. महापालिका आयुक्तांमुळेच विद्युत खांब काढण्याच्या कामाला गती मिळत नसून, रखडलेल्या कामाला मनपा आयुक्त जबाबदार आहेत.

-नवनाथ दारकुंडे, नगरसेवक, शिवाजीनगर

Web Title: The proposal to remove the power pole fell three months later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.