जिल्ह्यात दहा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:16 AM2021-04-24T04:16:06+5:302021-04-24T04:16:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन वेगळा करणारे दहा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम करीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन वेगळा करणारे दहा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम करीत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजेंद्र राजपूत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
काही दिवस आधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. हे काम सध्या कार्यकारी अभियंता गजेंद्र राजपूत हे करत आहेत.
त्यांनी सांगितले की जिल्ह्यातील मोहाडी येथील महिला रुग्णालय, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर उपजिल्हा रुग्णालये, चाळीसगाव, अमळनेर आणि रावेर ग्रामीण रुग्णालय यासह दहा रुग्णालयांमध्ये हे ऑक्सिजन सेपरेटर उभे राहणार आहे. कोणत्या रुग्णालयासाठी किती क्षमतेचा प्रकल्प लागेल यावर सध्या काम केले जात आहे.’
रुग्णाची प्रकृती गंभीर नसेल आणि ऑक्सिजनवर असेल तर त्यात दोन बेडला एका दिवसाला एक सिलिंडर लागतो. साधा व्हेंटिलेटर असेल तर एका दिवसाला एका बेडला दोन ते तीन सिलिंडर लागतात. मात्र कोरोनाचा हाय फ्लो सिलिंडर असेल तर दिवसाला १२ सिलिंडरपर्यंत कृत्रिम प्राणवायू लागतो. या प्रमाणेच रुग्णालयांमध्ये किती ऑक्सिजनचा वापर केला जात आहे. याची माहिती घेऊन काम केले जात आहे.
कसे काम करतो हा एअर सेपरेटर
हवेमध्ये ७८ टक्के नायट्रोजन असतो. २० टक्के ऑक्सिजन आणि एक टक्के इतर वायू असतो. या सेपरेटरमधील कॉम्प्रेसर हवेतून ऑक्सिजन वेगळा होतो. मेडिकल ग्रेडचा ऑक्सिजन ९५ टक्के इतका शुद्ध असतो. यात प्रत्येक रुग्णालयाच्या क्षमतेनुसार तेथे ऑक्सिजन प्लान्टचे काम केले जाणार असल्याचेही राजपूत यांनी सांगितले.