जळगाव विभागातील १३ बसस्थानकांसाठी पुन्हा प्रस्ताव मागविले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 07:44 PM2023-08-24T19:44:34+5:302023-08-24T19:44:44+5:30
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत बसस्थानकांची देखभाल व दुरुस्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागात जिल्हाभरातून ७ प्रस्ताव आले होते.
भूषण श्रीखंडे
जळगाव: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत बसस्थानकांची देखभाल व दुरुस्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागात जिल्हाभरातून ७ प्रस्ताव आले होते. आलेल्या प्रस्तावांना मंजुरी लवकरच दिली जाणार असून, ज्या बसस्थानकांना प्रतिसाद आलेला नव्हता त्या बसस्थानकांसाठी या योजनेचे पुन्हा प्रस्ताव मागविले जाणार आहे. तसेच ‘स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ स्पर्धेत जळगाव विभागाच्या पाच आगारांना चांगले गुणांकन मिळाले आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या ‘स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील बसस्थानकांचे पहिल्या टप्प्याचे सर्वेक्षण करण्यात आले. पहिल्या टप्प्याच्या निकालात जळगाव, अमळनेर, रावेर, चोपडा, भुसावळ बसस्थानक उत्तीर्ण झाले आहेत. यात जळगाव बसस्थानकाला १०० पैकी ५० गुण, अमळनेर ६२, जामनेर ६१, चोपडा ७७, भुसावळ ४९ गुण मिळाले आहेत. त्याअनुषंगाने अन्य बसस्थानकांचे रुप पालटण्यासाठी जळगाव एस.टी. महामंडळाने बस दत्तक योजनेंतर्गत ज्या बसस्थानकांसाठी प्रतिसाद आला नव्हता त्या बसस्थानकांसाठी पुन्हा प्रस्ताव मागितले जाणार आहे.
भुसावळ बसस्थानकाला कमी गुण
स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याच्या सर्वेक्षणाच्या निकालात भुसावळ बसस्थानकात पाण्याची समस्या, सोयीसुविधांची कमतरता तसेच बसस्थानकातील रस्ता खराब असल्यामुळे ४९ गुण मिळाले आहेत.