लोडशेडिंगच्या विरोधात ठिय्या आंदोलन, जळगांवचे शेतकरी झाले आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 12:21 PM2023-08-30T12:21:58+5:302023-08-30T12:25:34+5:30
शेतकऱ्यांना फक्त आठ तास वीज, त्यातही कमी दाबाने पुरवठा
भुसावळ (जि.जळगाव): अचानक सुरु केलेल्या लोडशेडिंगच्या विरोधात वेल्हाळे ता. भुसावळ येथील शेतकऱ्यांनी उपकेंद्राच्या बाहेर बुधवारी सकाळी सहा वाजेपासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पावसाअभावी पिकेही जळून जात आहेत. मात्र महावितरणच्या कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत असून बारा तास लोडशेडिंग केले जात आहे. शेतकऱ्यांना फक्त आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. मात्र या आठ तासांमध्येही कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मोटरी जळून जाणे अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वेल्हाळे उपकेंद्राच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत पूर्ण दाबाने वीजपुरवठा होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरु राहिल, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.