वाहनधारकांना गुलाबपुष्प देत पेट्रोलदरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:18 AM2021-05-18T04:18:07+5:302021-05-18T04:18:07+5:30
जळगाव : केंद्र सरकारने वाढविलेल्या इंधन आणि रासायनिक खतांची झालेली दरवाढ याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी दुपारी १२ वाजता ...
जळगाव : केंद्र सरकारने वाढविलेल्या इंधन आणि रासायनिक खतांची झालेली दरवाढ याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी दुपारी १२ वाजता पक्ष कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यासह पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फूल देऊन राष्ट्रवादी युवकतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले.
कोरोनाची टाळेबंदी, अवकाळी व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मोठा फटका बसला आहे. शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. यंदाचा खरीप हंगाम जवळ आला असून त्यासाठी लागणारी खते, बियाणांच्या किमती भाजपच्या केंद्र शासनाने भरमसाठ दरवाढ केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पेट्रोल, डिझेलची दरवाढ सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर असल्याचे सांगत याच्या निषेधार्थ पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजीही केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, वाल्मिक पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष तथा जि. प. सदस्य रवींद्र पाटील, मंगला पाटील, संदीप पाटील, अशोक पाटील, अमोल कोल्हे, अजय बढे, सुनील माळी, अशोक लाडवंजारी आदी उपस्थित होते.
पेट्रोलपंपावर दिले गुलाब पुष्प
जि. प. सदस्य रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाब पुष्प देऊन पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यात आला. पेट्रोल पंपावर लावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला देखील गुलाब पुष्प देण्यात आले. याप्रसंगी प्रदेश सचिव संदीप पाटील, जिल्हा सरचिटणीस अनिल खडसे, सरचिटणीस सुशील शिंदे, धवल पाटील, अमोल कोल्हे, किशोर सूर्यवंशी,हर्षल वाघ, भूषण पवार,योगेश नरोटे,राजू शेख आदी मंडळी उपस्थित होती.