मुख्यमंत्र्यांनी धुतलेल्या गाईची धार काढून शेतकरी असल्याचे सिद्ध करून दाखवावे- धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 03:32 PM2018-02-20T15:32:58+5:302018-02-20T15:33:10+5:30
शेतकर्यांचे गळ्यात गट नंबर, नुकसानग्रस्त पिकांची माहिती लिहिलेली आरोपीसारखी पाटी टांगून पंचनामा करणार्या या सरकारसारखे शेतकर्यांना चोर समजणारे सरकार जगाच्या पाठीवर कुठेही नसून शेतकर्यांचा घोर अपमान करणार्या या सरकारविरुद्ध अपमानाचा बदला घेण्यासाठी आम्ही हल्लाबोल करीत आहोत.
रावेर - शेतकर्यांचे गळ्यात गट नंबर, नुकसानग्रस्त पिकांची माहिती लिहिलेली आरोपीसारखी पाटी टांगून पंचनामा करणार्या या सरकारसारखे शेतकर्यांना चोर समजणारे सरकार जगाच्या पाठीवर कुठेही नसून शेतकर्यांचा घोर अपमान करणार्या या सरकारविरुद्ध अपमानाचा बदला घेण्यासाठी आम्ही हल्लाबोल करीत आहोत. या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकही मंत्री शेतकर्याचे मूल नसल्याचे मोठे दुर्भाग्य असून, असे वेडेवाकडे निकष काढणार्या सरकारच्या मुख्यमंत्री फडणवीसांना खुले आव्हान करतो की, आपण धुऊन आणलेल्या गाईला नुसती खाली बसून धार फोडून दाखवावी अन् पाच पिढ्यांपासून पिढीजात शेतकरी असल्याचे सिद्ध करून दाखवावे ? असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज येथे केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनात सरकारविरुद्ध तोफ डागताना ते बोलत होते.
खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, अरुणभाई गुजराथी, आमदार जयंत पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, जिल्हाध्यक्ष आमदार सतीश पाटील, रंगनाथ काळे, सुरेखा ठाकरे, संग्राम पाटील आदींच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल यात्रेचे स्वागत झाले. माजी आमदार अरुण पाटील यांनी या हल्लाबोल यात्रेचे स्वागत केले.
यापुढे हल्लाबोल करताना धनंजय मुंडे म्हणाले, या महाराष्ट्राच्या जाणत्या राजाने १७१ कोटींची कर्जमाफी घरपोच दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एकच प्रश्न विचारायचा की, कर्जमाफीच्या ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी शेतकर्यांना त्यांची पत्नी सोबत बोलावून काय तुमच्या घरच्या सत्यनारायण पूजेचा महाप्रसाद देणार होतात काय? शेतकर्यांना कर्जासाठी बोजा नको, आधारकार्ड नको अन् मोठमोठ्या धेंडांना ४० - ४०, ५०-५० कोटी रुपये कर्ज विनाबोजाने अन् बिना जप्तीच्या कारवाईने कर्जाची खिरापत वाटणार्या सरकारने फसवणूक केल्याची तोफ त्यांनी डागली.
नीरव मोदीला छोटा मोदी म्हणणार्यांविरुद्ध कारवाई केली जाते. मात्र छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी ना भाजपाचे जिल्हाध्यक्ष वा प्रदेशाध्यक्ष तथा मुख्यमंत्र्यांनी ना साधी खंत मानली ना दिलगीरी व्यक्त केली. छत्रपती का आशीर्वाद चलो चले मोदी के साथ अशा छत्रपती शिवरायांच्या नावावर सत्तेवर येऊन भाजपा सेनेवाल्यांनो आपण या महाराष्ट्रात शिवरायांचा घोर अपमान करत असाल तर, या महाराष्ट्राच्या सत्तेतच काय या महाराष्ट्राच्या १० वर्षांच्या राजकारणात आपल्या राजकारणाची बी पण दिसणार नाही, असा सज्जड दमही मुंडे यांनी बोलताना दिला.