जिल्ह्यासाठी कोविड रेल्वे आयसोलेशन बेड उपलब्ध करून घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:15 AM2021-04-13T04:15:13+5:302021-04-13T04:15:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असून शासकीय व खासगी रुग्णालयातील बेड फुल्ल झाले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असून शासकीय व खासगी रुग्णालयातील बेड फुल्ल झाले आहेत. रुग्णांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने तयार केलेले रेल्वे कोविड आयसोलेशन कोच जळगाव जिल्ह्यासाठी उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी माजी महापौर तथा नगरसेविका भारती सोनवणे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री व रेल्वेमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, माजी महापौर भारती सोनवणे यांनी खासदार उन्मेष पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद असून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे. महापौर भारती सोनवणे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना मेलद्वारे निवेदन पाठविले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालये फुल्ल झाली असून रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने फिरफिर करावी लागत आहे. जिल्हा प्रशासनाकडून नवीन रुग्णालये आणि इमारती कोविड अधिग्रहित केली जात असली तरी ती कमी पडू लागली आहे. देशातील कोविड रुग्णांना तत्काळ सुविधा मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने रेल्वे विभागामार्फत देशभरात ४०० रेल्वे कोचचे रूपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये करण्यात आले आहे. शहरातदेखील कोविड रुग्ण वाढत असल्याने काही कोच जळगावला पाठविण्यात यावे किंवा जिल्ह्यातील प्रमुख आणि रेल्वेची सुविधा असलेल्या तालुक्यांसाठी ते कोच राखीव ठेवण्यात यावेत, जेणेकरून रुग्णांना तत्काळ उपचार देणे शक्य होईल.