लोककलावंतांना आर्थिक सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:17 AM2021-05-07T04:17:16+5:302021-05-07T04:17:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव शाखा आणि खान्देश लोक कलावंत परिषदेतर्फे जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव शाखा आणि खान्देश लोक कलावंत परिषदेतर्फे जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे-खेलवकर यांनी लोक कलावंतांना आर्थिक सहकार्य करावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिले.
या निवेदनात म्हटले की, तमाशा, वहिगायन, गोंधळ या सारख्या विविध कला प्रकारांच्या सादरीकरणावर अनेक कुटुंबांची गुजराण होत असते. गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे लॉकडाऊन व अन्य विविध कारणांनी लोककलांचे सादरीकरण बंद झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखा, अखिल भारतीय मराठी लोककलावंत परिषदेच्या माध्यमातून कलावंतांना मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र शासकीय स्तरावरून अद्यापही या कलावंतांना मदत मिळालेली नाही. या कलाकारांना मदत मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी खान्देश लोक कलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह ॲड. पद्मनाभ देशपांडे, सरकार्यवाह योगेश शुक्ल, कार्यकारिणी सदस्य संदीप घोरपडे उपस्थित होते.
कलावंतांसाठी पाच क्विटंल गहू दिला
जिल्ह्यातील दानशुर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या आवाहनाला जिल्हाधिकारी कार्यालयातच प्रतिसाद मिळाला. सुनसगावचे सरपंच नीलेश साबळे हे कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत कलावंतांसाठी पाच क्विंटल गहु देण्याची तयारीही दर्शवली.