बाल हत्याकांडातील कुटुंबियांना घरकुलासाठी भूखंड प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 02:10 PM2020-11-04T14:10:31+5:302020-11-04T14:11:55+5:30
बोरखेडा शिवारातील रस्त्यालगत झालेल्या चौघा भावंडांच्या बालहत्याकांडातील कुटुंबियांना घरकुलासाठी भूखंड प्रदान करण्यात आला.
रावेर : बोरखेडा शिवारातील रस्त्यालगत झालेल्या चौघा भावंडांच्या बालहत्याकांडातील कुटुंबियांना घरकुलासाठी भूखंड प्रदान करण्यात आला.
रखवालदाराने घरात एकटे झोपलेल्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिच्यासह तिच्या दोन्ही भाऊ व चिमुरड्या बहिणीचे कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्याकांड केल्याच्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेने शासन व पोलीस यंत्रणा खळबळून जागी झाली होती. त्या अनुषंगाने बुधवारी पीडितेसह चौघा बालकांच्या हत्याकांडात उघड्यावर पडलेल्या पीडितेच्या कुटूंबाचे पुनर्वसन करण्यासाठी तहसीलदार उषाराणी देवगुणे व गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी बक्षीपूर ग्रा.पं.च्या गावठाण हद्दीत रावेर शिवारातील गट नं. १२४१ मधील ४४८ चौ.मी. क्षेत्रफळ असलेल्या भूखंडाचे सर्व्हेक्षण करून आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते घरकुलासाठी त्या भूखंडाच्या मालकी हक्काचा थेट उतारा प्रदान केला.
भूमीअभिलेख उपअधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा मेडीकल काँग्रेस सेलचे डॉ.सुरेश पाटील, कृउबाचे माजी सभापती गोंडू महाजन, रसलपूरचे माजी सरपंच सुभाष वानखेडे यांनी पीडितेच्या हत्याकांडातील उघड्यावर आलेल्या भिलाला कुटूंबीयांची भेट घेऊन त्यांना बक्षीपूर गावठाण विस्तार योजनेतील भूखंडाचा मालकीहक्काचा उतारा प्रदान केला. लवकरच शबरी आवास योजनेंतर्गत घरकुलाचा प्रस्ताव दाखल करून या निर्वासित व या कुटुंबियांना निवारा उपलब्ध करून आधार देण्यासाठी कटीबध्द असल्याचे आमदार चौधरी यांनी आश्वस्त केले.