ममुराबाद गावासाठी स्वतंत्र फीडर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:13 AM2021-06-04T04:13:26+5:302021-06-04T04:13:26+5:30
ममुराबाद : महावितरणच्या विदगाव उपकेंद्रावरील वीज पुरवठ्यात सातत्याने व्यत्यय येत असल्याने ममुराबादचे ग्रामस्थ काही दिवसांपासून कमालीचे त्रस्त झाले आहेत. ...
ममुराबाद : महावितरणच्या विदगाव उपकेंद्रावरील वीज पुरवठ्यात सातत्याने व्यत्यय येत
असल्याने ममुराबादचे ग्रामस्थ काही दिवसांपासून कमालीचे त्रस्त झाले आहेत.
विजेच्या वाढत्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गावासाठी स्वतंत्र ११ केव्ही
फीडरची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी वीज ग्राहकांकडून करण्यात आली
आहे.
विदगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रावरून ममुराबादसह परिसरातील
नांद्रा खुर्द, खापरखेडा, धामणगाव, तुरखेडा, आवार आणि विदगाव आदी बऱ्याच
गावांना वीजपुरवठा करण्याची सोय उपलब्ध आहे. वीज मागणी व ग्राहकांची
संख्या लक्षात घेता या उपकेंद्रांतर्गत ममुराबाद हे सर्वात मोठे गाव आहे.
वीज बिलाच्या वसुलीत अग्रेसर असलेल्या याच गावामुळे विदगाव वीज उपकेंद्र
सुरळीतपणे चालते. प्रत्यक्षात महावितरणकडून ममुराबादच्या वीज ग्राहकांना
कधीच चांगल्या दर्जाची सेवा मिळत नाही. एरव्ही दिवसा व रात्री अचानक वीज
पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने सुरू असतात. त्यात कमी दाबाच्या
वीज पुरवठ्यामुळे वीज उपकरणे व्यवस्थित काम करीत नसल्याने ग्रामस्थांच्या
अडचणीत आणखी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. खंडित वीज पुरवठ्यामुळे तापी
नदीवरील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रकारसुद्धा वाढत चालले आहेत. विजेच्या समस्यांमुळे निर्माण झालेला सर्व त्रास वीज ग्राहक मुकाटपणे सहन
करीत असतात. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता विदगाव वीज उपकेंद्रातून ममुराबाद गावासाठी स्वतंत्र ११ केव्ही क्षमतेचा फीडर कार्यान्वित करण्यात
यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.