कारगील युद्धात शहीद जवानाच्या कुटुंबीयांना दोन हेक्टर जागा प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 21:50 IST2021-06-10T21:49:49+5:302021-06-10T21:50:39+5:30
शहीद जवान- भानुदास सोनु बेडीस्कर यांना कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी शासनाकडून दोन हेक्टर जागा देण्यात आली.

कारगील युद्धात शहीद जवानाच्या कुटुंबीयांना दोन हेक्टर जागा प्रदान
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : तामसवाडी ता. पारोळा येथील शहीद जवान- भानुदास सोनु बेडीस्कर यांना कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी शासनाकडून दोन हेक्टर जागा देण्यात आली. पारोळा - धरणगाव रोडवर ही जागा आहे. यासंबंधीचे कागदपत्रे गुरुवारी बेडीस्कर यांच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आली. यासाठी शासनाला तब्बल २३ वर्षाच्या कालावधी लागला.
जम्मू कश्मिरमधील कुप्पवाडा येथे कारगिल युद्धात भानुदास बेडिस्कर यांना दि.२८ ऑगस्ट १९९७ रोजी वीर मरण आले होते. शहिद झाल्या नंतर तब्बल २३ वर्षानी ही २ हेक्टर जागा वीरपत्नी सरला भानुदास बेडिस्कर याना सुपूर्द करण्यात आली.
दोन हेक्टर जागा तहसीलदार अनिल गवांदे यांच्याहस्ते उताऱ्याच्या कागदपत्रांसह सोपविण्यात आली. शहीद जवान भानुदास बेडीस्कर हे पहिलेच शहीद जवान आहेत, वीर मरणानंतर कुटुंबाला शासकीय जागा मिळाली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत , उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांनी पाठपुरावा करून जागा उपलब्ध करून दिली. यावेळी तहसीलदार बी.आर शिंदे , शहर तलाठी निशिकांत पाटील, गौरव लांजेवार, एस.पी पाटील , भुमी अभिलेखचे शिंदे व वीरपत्नी सरला बेडीस्कर व त्याचे कुटुंब उपस्थित होते.