कारगिल युद्धात शहीद जवानाच्या कुटुंबीयांना दोन हेक्टर जागा प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:12 AM2021-06-11T04:12:09+5:302021-06-11T04:12:09+5:30
पारोळा : तामसवाडी, ता. पारोळा येथील शहीद जवान भानुदास सोनू बेडीस्कर यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शासनाकडून दोन हेक्टर जागा देण्यात ...
पारोळा : तामसवाडी, ता. पारोळा येथील शहीद जवान भानुदास सोनू बेडीस्कर यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शासनाकडून दोन हेक्टर जागा देण्यात आली. पारोळा - धरणगाव रोडवर ही जागा आहे. यासंबंधीची कागदपत्रे गुरुवारी बेडीस्कर यांच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आली. यासाठी शासनाला तब्बल २३ वर्षांच्या कालावधी लागला.
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे कारगिल युद्धात भानुदास बेडीस्कर यांना २८ ऑगस्ट १९९७ रोजी वीरमरण आले होते. शहीद झाल्यानंतर तब्बल २३ वर्षांनी ही २ हेक्टर जागा वीरपत्नी सरला भानुदास बेडीस्कर यांना सुपूर्द करण्यात आली. दोन हेक्टर जागा तहसीलदार अनिल गवांदे यांच्या हस्ते उताऱ्याच्या कागदपत्रांसह सोपविण्यात आली.
शहीद जवान भानुदास बेडीस्कर हे पहिलेच शहीद जवान आहेत, वीर मरणानंतर कुटुंबाला शासकीय जागा मिळाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांनी पाठपुरावा करून जागा उपलब्ध करून दिली. यावेळी तहसीलदार बी. आर. शिंदे, शहर तलाठी निशिकांत पाटील, गौरव लांजेवार, एस. पी. पाटील, भूमी अभिलेखचे शिंदे व वीरपत्नी सरला बेडीस्कर व त्याचे कुटुंब उपस्थित होते.
फोटो ओळ : शहीद जवान भानुदास बेडीस्कर यांच्या पत्नी सरला बेडीस्कर यांना शासकीय जागेची कागदपत्रे सुपुर्द करताना अनिल गवांदे, बी. आर. शिंदे, निशिकांत पाटील, गौरव लांजेवार.