संबंधितांविरुद्ध कारवाईची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2017 11:35 PM2017-03-07T23:35:07+5:302017-03-07T23:35:07+5:30

१० रुपयांच्या नाण्याचा प्रश्न : फौजदारी, ग्राहक संरक्षण कायद्यान्वये तक्रारीस पात्र

Provision for action against relatives | संबंधितांविरुद्ध कारवाईची तरतूद

संबंधितांविरुद्ध कारवाईची तरतूद

Next

धुळे : देशात असलेले कायदेशीर चलन स्वीकारण्यास नकार दिल्यास त्याविरुद्ध ग्राहकास संबंधितांविरुद्ध कायद्याच्या मदतीने दाद मागता येते. त्यानुसार मग कारवाई होऊ शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. फौजदारी व ग्राहक संरक्षण या कायद्यांमध्ये त्या दृष्टीने तरतूद करण्यात आली आहे.
सध्या जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात १० रुपयांचा कॉईन घेण्यास नकार दिला जातो. त्यामुळे व्यवहार पूर्ण न होता, त्यात अडचण निर्माण होते. अशा वेळी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अन्वये ग्राहक न्यायमंचाकडे दाद मागू शकतो, अशी माहिती ग्राहक पंचायतीचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष डॉ. योगेश सूर्यवंशी यांनी दिली. तर अप्रामाणिकपणे अफवा पसरवणे, कारस्थान करणे या फौजदारी कायद्यातील तरतुदींनुसार रितसर तक्रार करता येते, अशी माहिती अ‍ॅड.अमित दुसाने यांनी दिली.
विनिमयाचे माध्यम म्हणून सरकारने चलन काढले आहे. रिझर्व्ह बॅँकेने त्यास मान्यता प्रदान केली आहे. अशा परिस्थितीत ते चलन वैध असताना स्वीकारण्यास नकार देणे म्हणजे लोकशाहीचा अपमान समजला जातो, असेही डॉ. सूर्यवंशी म्हणाले.
‘चॉकलेट’चे चलन स्वीकारता....!
एखाद्या दुकानावर ४८ रुपयांचा माल घेतल्यानंतर ५० रुपयांची नोट दिल्यास दुकानदार सुट्या दोन रुपयांऐवजी दोन चॉकलेट हातात टेकवतो, ते आपण स्वीकारतो. ते चलन म्हणून आपल्याकडून कोणी स्वीकारत नाही, तरी ते आपण सहज स्वीकारतो. मग हे वैध नाणे स्वीकारण्यास काय हरकत आहे, असेही डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
चलनात असलेले नाणे कोणी स्वीकारत नाही म्हणून त्याच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्याची कायद्यात काहीही तरतूद नाही.     - चैतन्या एस.,
जिल्हा पोलीस अधीक्षक, धुळे

Web Title: Provision for action against relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.