५८ कोटींच्या निधीतून प्रत्येक नगरसेवकांसाठी ५० लाखांची तरतूद!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 10:17 AM2022-03-09T10:17:28+5:302022-03-09T10:17:42+5:30
Jalgaon : चार वर्षांपूर्वी मिळालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून आता कुठे कामांना सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे या सर्व १०० कोटीच्या निधीतून केवळ रस्त्यांची कामे केली जाणार असून, पावसाळ्याच्या आधी ४२ कोटींच्या निधीतून मुख्य भागातील रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.
जळगाव : महापालिकेला नगरोत्थानांतर्गत मिळालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून एकीकडे ४२ कोटी रुपयांच्या निधीचा प्रश्न मार्गी लागत असताना, दुसरीकडे उर्वरित ५८ कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामांचा प्रस्ताव येत्या महासभेपुढे ठेवण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांचा भागातील कामे मार्गी लावण्यात यावी यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागातील कामांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे मुख्य भागातील रस्त्यांसह आता कॉलनी भागातील रस्त्यांच्या ही प्रश्न मार्गी लागणार आहे.
चार वर्षांपूर्वी मिळालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून आता कुठे कामांना सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे या सर्व १०० कोटीच्या निधीतून केवळ रस्त्यांची कामे केली जाणार असून, पावसाळ्याच्या आधी ४२ कोटींच्या निधीतून मुख्य भागातील रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. तर पावसाळ्यानंतर शहरातील कॉलनी भागातील रस्त्यांची कामे केली जाणार असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली. येत्या महासभेत ५८ कोटींतून होणाऱ्या कामांचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून, या कामांची अंतिम यादी तयार करण्याचे काम महासभेत सुरु आहे.
५ कोटींच्या निधीला मान्यता, ५८ कोटीत भाजपला ही मिळाले स्थान
१५ डिसेंबर रोजी झालेल्या महासभेत भाजप नगरसेवकांनी प्रभाग क्रमांक १० मध्ये होणारे ५ कोटींचे काम थांबविण्याचा निर्णय घेतला होता. तसेच बहुमताने या विषयाला स्थगिती दिली होती. भाजपला महासभेत बहुमत असल्याने या विषयाला मंजुरी मिळणे कठीण असल्याने, शिवसेनेने ५८ कोटींच्या निधीतून होणाऱ्या कामामधून भाजप नगरसेवकांचे प्रस्ताव वगळून हा विषय महासभेत न ठेवण्याचा निर्णय घेतला होता. भाजपची ५८ कोटींच्या निधीवरून कोंडी केल्यानंतर भाजपनेही नमते घेऊन, १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या महासभेत भाजपने ५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यामुळे शिवसेनेने देखील भाजपला ५८ कोटींच्या निधीत स्थान दिले आहे.
महासभेत १६० विषय मंजुरीसाठी
५८ कोटींच्या निधीतील कामांना मंजुरी देण्यासोबत जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून होणारी कामे, दलित वस्ती सुधार निधी व मनपा अंदाजपत्रक सादर करण्यासोबत सुमारे १६० विषयांचे प्रस्ताव महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महासभेत एवढ्या मोठ्या प्रमाणात विषय मंजुरीसाठी ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.