पं.स. गैरव्यवहाराची चौकशी व कारवाईचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:12 AM2021-06-29T04:12:46+5:302021-06-29T04:12:46+5:30
जामनेर : पंचायत समितीतील गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून ७ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे व त्यानंतर दोषींवर कारवाईचे आश्वासन जि.प.चे ...
जामनेर : पंचायत समितीतील गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून ७ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे व त्यानंतर दोषींवर कारवाईचे आश्वासन जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी उपोषण सोडले.
पं.स.तील सिंचन विहीर वाटपातील गैरप्रकार, विस्तार अधिकारी यांनी ग्रामपंचायतीत असताना केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करावी या मागणीसाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, डॉ. प्रशांत पाटील व सागर कुमावत यांनी गेल्या चार दिवसापासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती. उपोषणार्थींच्या तक्रारीवरून जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे.
सोमवारी दुपारी रणदिवे यांनी जामनेरला येऊन उपोषणार्थींशी चर्चा केली. राजेंद्र पाटील यांनी त्यांना पं.स.तील गैरव्यवहाराची माहिती देऊन सखोल चौकशीची मागणी केली. येथील कर्मचारी शासकीय कर्मचारी असले तरी ते भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करतात असा आरोप त्यांनी यावेळी केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील यांनी सांगितले की, जामनेर पं.स. भ्रष्टाचाराचे माहेरघर असल्याने स्वच्छ कारभारासाठी हे उपोषण होते. ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातील निधी परस्पर काढणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांवर व सिंचन विहिरीतील नियमबाह्य वाटपाबाबत दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा तालुक्याचे नेते संजय गरुड यांनी व्यक्त केली. यावेळी माजी आमदार मनीष जैन, जि.प.सदस्य प्रमिला पाटील, महिला अध्यक्ष वंदना चौधरी, ॲड. ज्ञानेश्वर बोरसे, पप्पू पाटील, किशोर पाटील, प्रल्हाद बोरसे व पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन २९ एचएसके 03
जामनेर पंचायत समितीतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी उपोषणास बसलेल्यांना लिंबू सरबत देऊन उपोषण सोडतांना कमलाकर रणदिवे, रवींद्र पाटील. सोबत संजय गरुड आदी.