मनोरुग्णाने मारली पहिल्या मजल्यावरून उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:19 AM2021-02-27T04:19:00+5:302021-02-27T04:19:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मानसोपचार कक्षात दाखल एका मनोरुग्ण तरूणाने सर्व सुरक्षा यंत्रण भेदत आपात्कालीन विभागाच्या वरच्या मजल्यावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मानसोपचार कक्षात दाखल एका मनोरुग्ण तरूणाने सर्व सुरक्षा यंत्रण भेदत आपात्कालीन विभागाच्या वरच्या मजल्यावर जावून थेट पलिकडे खाली उडी मारल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दुपारी बारा वाजता एकच धावपळ उडाली होती. उपस्थित परिचारिकांनी मात्र, सुरक्षा यंत्रणेच्या हलगर्जीपणावर ताशेरे ओढले.
संदीप नामक या तरूणाची आईही त्याला शोधत होती. अचानक तो खाली पडल्याचे लक्षात येताच त्याची आईही धावत आली, हा तरूण मनोरुग्ण असून त्याला बांधून ठेवा, अशी या तरूणाची आई सुरक्षा रक्षकांना सांगत होती. तरूण अचानक खाली पडल्याने त्याच्या पायाला सूज आली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. मारोती पोटे, डॉ. विजय गायकवाड, डॉ. आस्था गनेरीवाल यांनी धाव घेत तातडीने या तरूणाला व्हिलचेअर मागवून कक्षात दाखल केले. या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती.
सुरक्षा यंत्रणेवर नाराजी
हा तरूण कक्षातून बाहेर आलाच कसा, याची जबाबदारी कुणाची, सुरक्षा रक्षक निट कर्तव्य बजावत नसल्याचा सूर यावेळी उमटला, अनेक कर्मचाऱ्यांनीही याबाबत संताप व्यक्त केला. दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून पार्किंगमधून वाहनांतून पेट्रोल चोरीच्या घटना वाढल्यामुळे काही नागरिकांनी थेट सुरक्षा रक्षकांना जाब विचारून धारेवर धरले. एकीकडे पार्किंग बंधनकारक केले जाते, मात्र, वाहनांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायला कुणी तयार नाही, असा विरोधाभास असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.