पु. लं. कलावंतच नाही तर माणूस म्हणूनही खूप मोठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 11:36 AM2019-01-11T11:36:19+5:302019-01-11T11:36:32+5:30
-ना. धो. महानोर
जळगाव : पु. ल. देशपांडे हे उत्तुंग कलावंत होते, हे सर्वांनाच माहीत आहे, परंतु ते केवळ महान कलावंतच नव्हते तर सामाजिक भान असलेला एक चांगला माणूस म्हणूनही ते खूप मोठे होते, असे प्रतिपादन कविवर्य ना. धो. महानोर यांनी केले.
विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजित पुलोत्सवात दुसऱ्या दिवशी गुरुवारी सायंकाळी महानोर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम रोटरी हॉलमध्ये झाला. त्यावेळी महानोर यांनी मुलाखतीतून पु. लं. याचे वेगवेगळे पैलू उपस्थितांसमोर उलगडले. लेखक ज्ञानेश्वर शेंडे आणि विवेकानंद प्रतिष्ठानचे सांस्कृतिक प्रमुख किरण सोहळे यांनी ही मुलाखत घेतली.
कला क्षेत्र हे जात आणि वैयक्तीक विचारांच्या पलीकडे
एखााद्या राज्याची उंची ही त्या राज्याच्या संपन्नतेपेक्षा तेथील कलावंतानी मोजली जाते. कला क्षेत्र हे सामाजिक भान ठेवणारे व जात, धर्म आणि वैयक्तीक विचारांच्या पलिकडील आहे. हाच संदेश गदीमा, सुधीर फडके आणि पुलं यांनी दिला. हे तिघेही वेगवेगवळ्या विचासरणीचे होते मात्र त्यांनी आपले वैयक्तीक विचार कला क्षेत्रात येवू दिले नाही.
वाचन आणि अनेकांच्या सानिध्याने घडलो !
प्रचंड वाचन आणि पत्रव्यवहार आणि लोकांशी संपर्क तसेच त्यांचा सानिध्य यातून घडत गेलो, असेही महानोर यांनी यावेळी सांगितले. सुरुवातीला कविता वृत्तपत्रांना पाठविल्या परंतु त्या परत आल्या. राग न मानता सुधारणा केल्या आणि पुढे नामांकीत मासिकात ४ कविता एकाच वेळी प्रसिद्ध झाल्या. या कविता पु. ल. यांनी पाहिल्या आणि त्यांनी स्वत: मला पत्र पाठवून कौतुक केले. येथून पत्र्यवहार सुरु झाले आणि त्यांच्या सानिध्यात आलो बरेच काही त्यांच्याकडून शिकलो . प्रत्येक नवीन कलावंत आणि साहित्यिकाचे ते कौतुक करायचे हा त्यांचा मोठेपणा होता, हे सांगताना त्यांनी निसर्गाचे सौदर्य कोणत्याही साहित्यात उमटविणे सोपे नाही. मी एक लहान कवी असून स्त्रियांचे दु:ख, शेतकºयांच्या वेदना आपल्या कवितेतून उतरविण्याचा प्रयत्न केला. पण या वेदना व हे दु:ख खूप मोठे आहे, ते मांडणे कधीही अपूर्णच राहील.
शेतामध्येही भरविली पु. ल. यांनी मैफल
पु. ल. यांच्याशी स्नेह वाढल्यावर एकदा त्यांनी पळासखेड्याला येणार म्हणून सांगितले परंतु माझे घर धाब्याचे एकदम साधे होते. यामुळे मी टाळाटाळ केली परंतु त्यांनी येणारच म्हणून सांगितले. आणि ते आलेही. शेतामध्येच अगदी कमी लोकांमध्ये कवितांची मैफल यावेळी रंगली. निसर्गाचे, शेतीचे सौदर्य या मुक्कामात त्यांना खूपच भावले असेही महानोर यांनी सांगितले.
महाराष्ट्रापेक्षाही अमेरिकेत लाभला प्रचंड प्रतिसाद
पु. ल यांच्यासोबत अमेरिकेत संमेलनाला जाण्याची संधी लाभली. त्यांनी बोरकरांच्या काही कविता सादर केल्या. ५ हजारावर या ठिकाणी लोक उपस्थित होते. महाराष्ट्रात कोठे मिळाली नाही अशी चांगली दाद या ठिकाणी मिळाली. मी शेतीवर मग पाण्यावर कविता सादर केली.. यावेळी पुुु.ल. यांनी माझे कौतुक करताना हे ना. धो. नाही तर धोधो महानोर आहे, असा उल्लेख केला. प्रत्येकच चांगल्या कलावंताचे ते कौतुक करायचे.
कोट्यवधीची केली मदत
विविध कला प्रकारात तरबेज असलेले बहुआयामी व बहुरुपी पु.ल. यांनी कला क्षेत्रात स्वत:ला वाहून घेतले. पैसेही खूप कमवले परंतु दु:खी व गरजवंतांसाठी कोट्यवधी रुपये दान देवून टाकले. त्यांच्यातील माणूस हा अनेकदा दिसून आल्याचेही महानोर यांनी काही उदाहरणे देत सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल मनोहर यांनी केले. महानोर यांचे स्वागत डॉ.रत्नाकर गोरे यांनी केले. यावेळी रसिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
चित्रपटासाठी गिते लिहून घेतली
पु. ल. यांची कथा पटकथा असलेल्या ‘एक होता विदुषक’ चित्रपटासाठी मीच गीते लिहावीत असा आग्रह पु. लं. यांचा होता मात्र मी कधी खास चित्रपटासाठी गिते न लिहल्याने नम्र नकार दिला. परंतु त्यांनी माझ्याकडून भूपाळी, लावणी,गौळण अशी विविध गिते लिहून घेतली. गिते लिहीत असताना त्यांच्याकडूनच विविध माहितीचे भंडार मला प्राप्त झाले. यावेळी गावात पाहिलेले तमाशे, जळगावच्या हैदरी थिएटर मध्ये ऐकलेल्या पाहिलेल्या गौळणी आदीचा उपयोगही झाल्याचे महानोर यांनी सांगितले. लावणी गीत लिहताना पु. ल. यांनी स्वत: लावणी कार्यक्रमात नेवून अपेक्षित लावणी लिहून घेतली.
...आणि संतापही व्यक्त केला
वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना कला अकादमी उभारण्याचे लता मंगेशकर यांच्यासह प्रयत्न केले. सरकारकडून जागा देण्याचेही ठरले मात्र अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री बदलले आणि सरकारकडून नकाराचे पत्र आले. हा भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीचा अवमानच होता. मात्र काही काळाने नंतर पुन्हा प्रयत्न केले. मी मुख्यमंत्र्यांना कडक पत्र लिहिले. एक साधा कवी अगदीे कडक शब्दातही लिहू शकतो, हे त्यावेळी दिसले. आणि मंजुरीही मिळाली आग्रहाने पु. ल. यांचे नाव त्या अकादमीला दिले. एक दिलदार व्यक्ती, जगज्जेता, हसविणारा आणि रडविणारही, अष्टपैलू नव्हे तर त्यापेक्षा अधिक कितीतरी पैलू असलेल्या या कलावंताचे समाजावर असलेले ऋण न फिटणारे आहे, असे गौरवोद्गार महानोरांनी काढले.