जळगावातील बंदिस्त नाट्यगृह जानेवारीत होणार नागरिकांसाठी खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 02:35 PM2017-12-04T14:35:35+5:302017-12-04T14:37:00+5:30
पालकमंत्र्यांनी केली पाहणी
जळगाव: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवार दि.४ रोजी महाबळ रस्त्यावरील बंदिस्त नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली. नाट्यगृहाचे काम ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी व संबंधीत अधिकाºयांना दिल्या. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हाधिकाºयांना केली. उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांची तारीख घेत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र या नाट्यगृहाचे अद्याप सुमारे २० टक्के काम बाकी असून निधी वेळेत उपलब्ध झाला तरच डिसेंबरअखेर हे काम पूर्ण होऊ शकेल, असे समजते.
बंदिस्त नाट्यगृहाचे काम रखडले आहे. त्या कामाला पालकमंत्र्यांनी व त्यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकाºयांनी लक्ष घातल्यानंतर गती आली. आधी दिवाळीपर्यंतच हे काम पूर्ण करण्याची सूचना केली होती. मात्र निधी अभावी काम रखडल्याने डिसेंबरअखेर कोणत्याही परिस्थितीत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी स्वत: वेळोवेळी भेट देऊन कामाचा आढावा घेत आहेत. सोमवारी जिल्हा दौºयावर आलेल्या पालकमंत्र्यांनीही या बंदिस्त नाट्यगृहाच्या कामाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बाहेरूनच केली पाहणी
पालकमंत्री १०.३० वाजता या ठिकाणी भेट देणार होते. मात्र त्यांना धरणगावला जायचे असल्याने १० वाजताच ते बंदिस्त नाट्यगृहाच्या पाहणीसाठी पोहोचले. नाट्यगृहाच्या आवारात गाडीतून उतरल्यावर केवळ मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाऊन त्यांनी नाट्यगृहाची पाहणी केली. किती काम बाकी आहे? काय अडचणी आहेत? याची विचारणा केली. त्यावर या कामासाठी साडेतीन कोटीच्या निधीची गरज असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. हा निधी जिल्हाधिकाºयांनी उपलब्ध करून देण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली.
उद्घाटनाला मुख्यमंत्री येणार
या बंदिस्त नाट्यगृहाचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. जानेवारीत या नाट्यगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे नियोजित असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांची तारीख घेत असल्याचे सांगितले.
पहिले दहा नाट्यप्रयोग नाममात्र दराने
नवीन वर्षात नाट्यगृह नाट्य रसिकांसाठी खुले करुन पहिले दहा प्रयोग नाममात्र फी घेऊन नाटय रसिकांना दाखविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्थेची मदत घेण्याचा विचार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नामकरणाबाबतही चर्चा
या बंदिस्त नाट्यगृहाचे नाव कुठे टाकायचे असा प्रश्न पालकमंत्र्यांनी केला. त्यावर अधिकाºयांनी दर्शनी भागातील भिंतीवरील एक जागा दाखविली. यावेळी महापौर ललित कोल्हे यांनी या नाट्यगृहाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी केली. मात्र काम पूर्ण झाल्यावर याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.