‘समतोल’च्या माध्यमातून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 11:54 AM2019-03-08T11:54:00+5:302019-03-08T11:54:06+5:30
-सपना श्रीवास्तव
घरातून कुठल्याही कारणाने अथवा रागाने घर सोडलेल्या मुलांसाठी ‘समतोल प्रकल्प’ आधारवड ठरत आहे. तीन वर्षांपूर्वी ‘समतोल’ने जळगाव व भुसावळ स्टेशनवर कामाला सुरुवात केली असून, आजतागयत तब्बल १२३२ बालकांना सुखरुप त्यांच्या घरी सोपविले आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर विविध राज्यातील मुलांना, समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांच्यात परिवर्तन करुन घराकडे पाठविले आहे.
समाजात दातृत्व निर्माण व्हावे, या भावनेतून केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यापैकी ‘आईसारखे समाजावर नि:स्वार्थ प्रेम करुया’ या मातृत्व भावनेतून केशवस्मृती प्रतिष्ठानने आॅक्टोबर २०१५ पासून ‘समतोल प्रकल्प’ राबविण्यास सुरु केली आहे. कुठल्यातरी कारणाने घरातून पळून गेलेल्या किंवा रागाच्या भरात घर सोडलेल्या बालकांचे बालपण गुन्हेगारीच्या मार्गावर जाऊ नये, या करिता अशा मुलांचे समतोलच्या माध्यमातुन समुपदेशन करुन त्यांना सुखरुप घरी पोहचविण्याचे काम या समतोल प्रकल्पाच्या माध्यमातुन केले जात आहेत. मुंबई येथील समतोल फाऊंडेशनतर्फे २००४ पासून रेल्वे स्टेशन मुंबई विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुुरु आहे. या उपक्रमाच्या कार्याबद्दल केशवस्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. अविनाश आचार्य यांच्या स्मृतीबद्दल देण्यात येणारा डॉ. अविनाशी सेवा पुरस्काराने २०१३ मध्ये या संस्थेचा सन्मान करण्यात आला होता. या संस्थेच्या कार्याची दखल घेत, केशवस्मृती प्रतिष्ठानने जळगाव व भुसावळ स्टेशनवर समतोल प्रकल्प सुरु करण्याचा निश्चय केला . याची जबाबदारी गेल्या अनेक वर्षांपासून शोषित आणि पीडितासांठी काम करणाऱ्या सपना श्रीवास्तव यांच्याकडे सोपविली आहे. श्रीवास्तव व त्यांच्या टीमने हा उपक्रम सुुरु करण्यासाठी जळगाव व भुसावळ स्टेशनवर सर्वेक्षण केले असता, चार दिवसांत त्यांना तब्बल २०० बालके आढळून आली. समतोलने तीन वर्षांपासून हा उपक्रम सुुरु केल्यापासून भंगार वेचणारे, नशा करणारे, चोरी करणारे अशा पद्धतीने गुन्हेगारी जगताकडे वळण घेणाऱ्या हजारो मुलांचे समुपदेशन करुन,त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.
-सपना श्रीवास्तव
समतोल प्रकल्प, जळगाव.