जनजागृती करुन ग्राहक हितास प्राधान्य देणार -अरुण देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:03 PM2017-12-16T12:03:31+5:302017-12-16T12:09:47+5:30
अद्यापही ग्राहक जागृतीचे काम अपेक्षे इतके झालेले नाही
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 16- ग्राहकांमध्ये आपल्या हक्काबाबत जनजागृती करुन त्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीमार्फत प्रय} सुरु आहे. मात्र अद्यापही ग्राहक जागृतीचे काम अपेक्षे इतके झालेले नाही. या समितीच्या माध्यमातून जागृती करून ग्राहकहितास प्राधान्य देणार असल्याची माहिती राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष तथा राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण व. देशपांडे यांनी शुक्रवार, 15 डिसेंबर रोजी दुपारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात 15 ते 31 डिसेंबरपयर्ंत ग्राहक जागरण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाबाबत माहिती देताना देशपांडे हे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांच्यासह जिल्हा ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले की, शासनस्तरावर उदासीनता नाही. मात्र ग्राहक जागृतीचे काम अपेक्षेप्रमाणे झालेले नाही. आता गेल्या तीन-चार वर्षापासून ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्यावतीने ग्राहक संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे व ग्राहकांमध्ये जनजागृती करणे यावर भर देण्यात येत आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदार व सल्लागार समितीचे सदस्य यांच्यावतीने ग्राहक मेळावे, जनजागृती मोहिम व विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.