आरोग्य खात्यावरचा जनतेचा विश्वास उडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:20 AM2021-08-22T04:20:48+5:302021-08-22T04:20:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आरोग्य खाते हे लोकांचा जीव वाचविण्यासाठी असते. मात्र, त्याच खात्याकडून जनतेच्या पैशांचा अपव्यय होत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आरोग्य खाते हे लोकांचा जीव वाचविण्यासाठी असते. मात्र, त्याच खात्याकडून जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असेल किंवा गैरव्यवहार होत असतील तर अशा प्रकरणांमधून आरोग्य खात्यावरील सामान्यांच्या विश्वासाला तडा जाणार आहे. व्हेंटिलेटर खरेदी प्रक्रियेत चौकशीनंतर समोर आलेल्या बाबींनंतर आता अधिकारी व आरोग्य खात्यावरील नागरिकांचा विश्वास उडाला आहे. असे मत विविध स्तरातून उमटले. संबंधितांवर तातडीने कारवाई होणे गरजेचे असल्याचेही मत मान्यवरांनी मांडले आहे.
कोट
सिव्हिल हॉस्पिटलच्या व्हेंटिलेटर खरेदी प्रकरणात चौकशी समितीने नोंदविलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत. कोरोनाचा फास जळगावच्या जनतेला आवळत असताना व्हेंटिलेटर हा एकमेव उपाय आहे; परंतु आमचे शासकीय अधिकारी ज्या हलगर्जीपणा, भ्रष्टपणे लोकांच्या जिवाचा प्रश्न हाताळत आहेत ते पाहता अतिशय संताप येतो. कुठल्याही भ्रष्टाचाराशिवाय आरोग्याचे काम झाले पाहिजे. - वासंती दिघे, सामाजिक कार्यकर्त्या
शासनाचा कोणताही निधी हा नागरिकांच्या करातून आलेला असतो. त्यामुळे नागरिकांच्या हक्क आणि भावना त्याच्याशी जोडल्या गेलेल्या असतात. आपल्या घरात आपल्याला कोणती वस्तू घ्यायची असते तेव्हा त्याची गुणवत्ता व किंमत याची खात्री करूनच आपण ती घेत असतो. हीच गोष्ट प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांकडून जनतेला अभिप्रेत आहे. अधिकाऱ्यांचा बेजबादारपणा, स्वार्थ याआडून जर जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असेल तर तो जनतेचा विश्वासघात आहे. रक्षणकर्तेच जर भक्षक बनत असतील तर जनतेचा विश्वास उडणारच आहे. - डॉ. राधेश्याम चौधरी, सचिव आयएमए जळगाव
आरोग्य खाते हे नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी असते. मात्र, व्हेंटिलेटर खरेदी प्रकरणात तफावत आढळून आली असून, ही खरेदी प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. याचाच अर्थ काहीतरी चुकीचे झाले आहे. अशा प्रकरणांमुळे जिल्ह्यातील नागरिकांचा आरोग्य विभाग व अधिकाऱ्यांवरील विश्वास उडाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याची दखल घ्यावी व योग्य ती कारवाई तातडीने करावी. - शिवराम पाटील, महाराष्ट्र जागृत लोकमंच
कारवाईबाबत काय वाटते?
१ व्हेंटिलेटरच्या स्पेसिफिकेशनमध्ये प्रचंड तफावत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा मोठा गैरव्यवहार असून, यात संबधितांवर जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे. यात गुन्हे दाखल करायलाही जिल्हाधिकाऱ्यांनी मागे-पुढे पाहायला नको, असे आयएमएचे सचिव डॉ. राधेश्याम चौधरी यांनी म्हटले आहे.
२ या प्रकरणात पुरवठादार व जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी, त्यासह जळगावकरांच्या जिवाचा प्रश्न बघता व्हेंटिलेटर खरेदीची योग्यरीत्या चौकशी करून तातडीने कार्यवाही करावी, असे सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे यांनी म्हटले आहे.
३ या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यावर आरोग्य खात्याने कारवाई करणे अपेक्षित आहे. अन्यथा पुढील काळात कोणीही नियमांचे पालन करणार नाही. अराजकता माजू शकते, असे मत सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी व्यक्त केले आहे.