जनता कर्फ्यूचा सरकारी कार्यालयांमध्येही `फिव्हर`
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:29 AM2021-03-13T04:29:54+5:302021-03-13T04:29:54+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय : `लोकमत` प्रतिनिधीने दुपारी चारच्या सुमारास या ठिकाणी केलेल्या पाहणीत, नेहमी नागरिकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या गर्दीने गजबजलेल्या ...
जिल्हाधिकारी कार्यालय :
`लोकमत` प्रतिनिधीने दुपारी चारच्या सुमारास या ठिकाणी केलेल्या पाहणीत, नेहमी नागरिकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या गर्दीने गजबजलेल्या जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या दालनाबाहेर पूर्णत: शुकशुकाट दिसून आला. समोरील सर्व खुर्च्या रिकाम्या पडलेल्या होत्या. तर कार्यालयातील कर्मचारी कामात व्यस्त असलेले दिसून आले. तसेच इतर अधिकाऱ्यांच्या दालना बाहेरही एकही पदाधिकारी किंवा नागरिक कामा निमित्त आलेले दिसून आले नाही. नेहमी चारचाकी वाहनांच्या गर्दीमुळे गजबजलेला परिसरात, शुक्रवारी मात्र शुकशुकाट दिसून आल्याने, जणू जिल्हाधिकारी कार्यालयाला सुट्टी असल्याचे दिसून आले.
पोलीस अधीक्षक कार्यालय
पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकारी कामात व्यस्त असतांना दिसून आले. तर इतर पोलीस कर्मचारीही कामात व्यस्त असलेले दिसून आले. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोरही शुकशुकाट दिसून आला.
महापालिका
शहरातील नागरिकांच्या व नगरसेवकाच्या गर्दीने गजबजलेल्या मनपातही जनता कर्फ्यूचा फिव्हर दिसून आला. आयुक्तांसह इतर सर्व अधिकारी आपल्या दालनात कामात व्यस्त असलेले दिसून आले. तर शहरातील काही बोटावर मोजण्या इतकेच नागरिक कामानिमित्त मनपात आले होते. जनता कर्फ्यूमुळे दिवसभर मनपात शुकशुकाट असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद
मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेमध्येही कर्मचारी वगळता इतर कुठलेही लोकप्रतिनिधी दिसून आले नाही. यावेळी काही वरिष्ठ अधिकारींही आपल्या दालनात दिसून आले नाहीत. फक्त कार्यालयीन कर्मचारीच कामानिमित्त बाहेर फिरतांना आढळून आले.