जनता कर्फ्यू संपला, मात्र निर्बंध कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:16 AM2021-03-15T04:16:05+5:302021-03-15T04:16:05+5:30
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्ह्यात लावण्यात आलेले निर्बंध आता १६ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याचे ...
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्ह्यात लावण्यात आलेले निर्बंध आता १६ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी १४ मार्च रोजी दिले आहे. जळगाव महापालिका क्षेत्रातील जनता कर्फ्यू व चाळीसगाव, चोपडा येथील निर्बंध शिथिल करण्यात आले असून नवीन निर्बंधांमध्ये अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू, फळे, भाजीपाला, किराणा, दूध व वृत्तपत्रे वितरण या बाबी वगळता इतर दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेतच सुरू राहणार आहे. या सोबतच शनिवार, रविवार धार्मिक स्थळेदेखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाच्यावतीने २२ फेब्रुवारीपासून ते ६ मार्चपर्यंत निर्बंध घालण्यात आले होते. त्यानंतर त्यापेक्षाही अधिक झपाट्याने संसर्ग वाढत असल्याने निर्बंध मागे न घेता ते १५ मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले. त्यानंतर आता दररोज रुग्णसंख्या ९००च्या पुढे येत असल्याने हे निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे.
जिल्ह्यातील आठवडे बाजारही बंद राहणार असून धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. या सोबतच सिनेमागृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, बगिचे बंद ठेवण्याचेही आदेश दिले आहे. निदर्शने, मोर्चे यांच्यावरही बंधने आणले असून मर्यादित उपस्थितीत केवळ निवेदन देता येणार आहे.
जनता कर्फ्यू शिथिल
कोरोना नियंत्रणासाठी जळगाव महापालिका क्षेत्रात जनता कर्फ्यू व चाळीसगाव, चोपडा येथे निर्बंध घालण्यात आले होते. ते आता शिथिल करण्यात आले आहे. मात्र आता पूर्वीचे निर्बंध बेमुदत राहणार असल्याने शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजार कधी सुरू होणार हे अनिश्चित झाले आहे.