सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळामुळे मिळाली जळगावच्या गणेशोत्सवाला दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:30 PM2018-09-16T12:30:37+5:302018-09-16T12:32:01+5:30
स्वत:साठी आखली आचारसंहिता
सुशील देवकर
जळगाव: स्व.डॉ.अविनाश आचार्य यांच्या पुढाकारातून सुमारे २२ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने जळगाव शहरातील गणेशोत्सवाला नवी दिशा दिली. महामंडळाच्या प्रयत्नांमुळेच सुमारे १२ वर्षांपूर्वी प्रथमच जळगावात मंडळांना विविध विभागांच्या परवानग्यांसाठी सुरू झालेली एक खिडकी योजना ही जळगाव पॅटर्न म्हणून आज राज्यात राबविली जात आहे. मुंबईत यंदा ही योजना राबविली जात आहे.
मुंबईत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर होत असतानाही गणेशोत्सव समन्वय समितीमुळे शिस्तबद्धता दिसून येते. त्यामुळे या समितीचे तत्कालीन अध्यक्ष जयंत साळगावकर यांची स्व. डॉ.आचार्य यांच्यासह जळगावाच्या मंडळींनी भेट घेतली. त्यात विद्यमान अध्यक्ष सचिन नारळे, किशोर भोसले, अमित भाटिया, ललित चौधरी, दीपक जोशी, मुकुंद मेटकर, राजू सोनवणे, बंटी नेरपगारे, सुजीत जाधव, मुन्ना परदेशी, महेंद्र गांधी आदींचा सहभाग होता. त्यांच्याकडून समितीच्या स्थापनेचा उद्देश समजून घेतला आणि आपणही जळगावातील गणेशोत्सवाला दिशा देण्याच्या दृष्टीने, उत्सवाचे पावित्र्य, शिस्त राखण्याच्या उद्देशाने महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अशी मिळाली दिशा
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ स्थापन होण्यापूर्वीही जळगावात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव उत्साहात साजरा होत होता. मात्र मंडळांमध्ये समन्वय नसल्याने तो उत्सव शहराचा लोकोत्सव वाटण्याऐवजी त्या-त्या मंडळांपुरता मर्यादित रहात होता. विसर्जन मार्ग मात्र पूर्वीपासून तोच होता. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या स्थापनेनंतर सर्व गणेश मंडळ पदाधिकारी, प्रशासन, सामाजिक संस्था यांच्यातील समन्वयाचे नवे पर्व सुरू झाले.
स्वत:साठी आखली आचारसंहिता
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पुढाकाराने सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी स्वत:साठी आचारसंहिता लागू करून घेतली. त्यात डी.जे. मुक्त गणेशोत्सव, विसर्जन मिरवणुकीत गुलालाचा वापर करायचा नाही. फुलांच्या पाकळ्या वापराव्यात, महिलांचा सहभाग वाढविणार, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके मिरवणुकीत सहभागी करणे, विसर्जन मिरवणुकीत महामंडळाचे वैद्यकीय कक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव लोकांसाठी आनंदोत्सव कसा होईल? यासाठी प्रयत्न करणे असे नियम स्वत:वर लावून घेत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या माध्यमातून गणेश मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. त्याचे सकारात्मक परिणाम आजच्या जळगाव शहरातील गणेशोत्सवातून दिसून येत आहेत.
‘एक खिडकी’चा जळगाव पॅटर्न
गणेश मंडळांना मनपा, वीज मंडळ, वाहतूक पोलीस आदी विविध विभागांच्या परवानग्या घ्याव्या लागतात. त्यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागत असे. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या स्थापनेनंतर या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यातूनच सुमारे १२ वर्षांपूर्वी गणेश मंडळांना आवश्यक सर्व परवानग्या एकाच छताखाली देण्याच्या उद्देशाने ‘एक खिडकी योजना’ राज्यात सर्वप्रथम जळगावात सुरू झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा त्रास कमी झाला. हीच योजना ‘जळगाव पॅटर्न’ म्हणून राज्यातही वापरली जाऊ लागली. या वर्षी मुंबईतही हा ‘जळगाव पॅटर्न’ वापरला जात आहे.
प्रत्येक मंडळाची स्थापनेची मूर्ती शाडूची
महामंडळ मंडळांना दरवर्षी नवीन थीम दिली जाते. यंदा सुरक्षा, समरसता, पर्यावरण ही थीम आहे. मंडळांनी परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. उत्सव मूर्ती मोठी असल्याने सर्वच गणेश मंडळ स्थापनेसाठी लहान मूर्तीही घेतात. ती लहान मूर्ती शाडू मातीची असावी, असे ठरविण्यात आले. निर्माल्य तलावात, अन्यत्र कुठेही न टाकता त्याचे संकलन मनपाच्या निर्माल्य रथात करण्याचीही पद्धत सुरू झाली आहे. सायंकाळची आरती सर्व गणेश मंडळांनी एकाच वेळी रात्री ८ वाजता घेतली जाते. सामाजिक समरसतेच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल या वर्षीपासून टाकण्यात आले असून स्थापनेच्या दिवशी टॉवर चौकात दोन गणेश मंडळांच्या श्रींची श्रमीक, मजूर वर्गातील नागरिकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यांना उत्सवाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे.
विसर्जन मिरवणूक ठरलीय लोकोत्सव
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या प्रयत्नांमुळे विसर्जन मिरवणुकीत शिस्तबद्धता आली. विसर्जन मार्ग पूर्वीचाच असला तरीही मिरवणुकांचे नियोजन होऊ लागले. त्यात आकर्षक देखावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आल्याने तसेच शिस्तबद्धता आल्याने नागरिकांची या मिरवणुका पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.