प्रेमासाठी जबरदस्ती करणाऱ्या मजनूला ‘पब्लिक मार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:31 PM2020-02-20T12:31:31+5:302020-02-20T12:32:10+5:30
पोलिसांमुळे टळली मोठी दुर्घटना; गुन्हा दाखल
जळगाव : एकतर्फी प्रेमातून सतत तरुणीचा पाठलाग व जबरदस्ती करणाºया शब्बीर शहा भुरुशहा (२४, रा. फकिरवाडा, म्हसावद, ता. जळगाव) याची तरुणीचे नातेवाईक व बसमधील प्रवाशांनी चांगलाची धुलाई केली. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी एस.टी.बस पोलीस ठाण्यात नेण्यात आली. बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता इच्छादेवी चौकाजवळ ही घटना घडली. शब्बीर याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील २१ वर्षीय तरुणी नूतन मराठा महाविद्यालयात रोज एस.टी.बसने शिक्षणासाठी येते. शब्बीर शहा भुरुशहा हा या तरुणीला ओळखतो, त्यातून तो गेल्या काही दिवसापासून तिचा पाठलाग करीत आहेत. तरुणीच्या वडीलांचे त्या गावात दुकान असून त्या दुकानावर येताना व जाताना शब्बीर हा तिला तु कोणत्या महाविद्यालयात शिक्षण घेते, मी तुझ्यावर प्रेम करतो यासह आणखी अश्लिल शब्दप्रयोग करीत होता. या प्रकाराला कंटाळलेल्या तरुणीने पालकांना हा प्रकार सांगितला असता त्यांनी शब्बीर याच्या कुटुंबाला सांगण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे तरुणी गप्प बसली होती.
कुटुंब सोबत असतानाही अश्लिल हावभाव
पीडित तरुणी व तिची बहिण मंगळवारी महाविद्यालयात आली होती. जळगाव-एरंडोल बसने घरी जाताना याच बसमध्ये असलेला शब्बीर पीडितेच्या बहिणीजवळ बसला आणि एकटक तिच्याकडे बघत राहिला.त्यामुळे ही तरुणी त्या सीटवरुन उठून बहिणीजवळ बसली. तेव्हाही तो अश्लिल हावभाव करायला लागला. बस तांबापुराजवळ आल्यावर तरुणीने त्याला जाब विचारला असता, तु गावात चल, तुला बघतो म्हणून परत धमकी दिली. या प्रकारामुळे पीडित तरुणीने शहरात राहणाºया मावस भावाला बोलावून घेतले. त्यानंतर त्याला तेथे चोपण्यात आले.यावेळी त्याची आई व भाऊ देखील बसमध्ये होते.
संभाव्य घटनेचा अंदाज अन् पोलिसाची तत्परता...संशयिताच्या मुसक्या आवळल्या
तरुणीच्या छेडखानीमुळे शब्बीर याला पब्लीक मार पडत असल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच वेळी पाचोरा येथे शिवजयंती बंदोबस्ताला जात असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे रामकृष्ण पाटील व शरद भालेराव हे तेथे थांबले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता रामकृष्ण पाटील यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार आनंदसिंग पाटील व मनोज सुरवाडे यांना घटनेची माहिती देवून तात्काळ अतिरिक्त कुमक मागवून घेतली. त्यावेळेत इकडे पाटील व भालेराव यांनी नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन करुन शब्बीर याचा मार वाचविला. उपनिरीक्षक गणेश कोळी, आनंदसिंग पाटील, नितीन पाटील व लुकमान तडवी यांनी बसचा ताबा घेऊन थेट पोलीस ठाण्यात आणली. तेथेही प्रवाशी शब्बीर याच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान, पीडित तरुणीच्या फिर्यादीवरुन शब्बीर याच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन व निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी पीडितेकडून घटनाक्रम जाणून घेतला.