भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:36 AM2018-11-28T00:36:21+5:302018-11-28T00:37:11+5:30
भुसावळ शहराला लागून असलेल्या कंडारी शिवारातील एका भूखंडाच्या गेटचे कुलूप तोडून या जागेत बेकायदा घुसून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याची घटना मंगळवारी घडली.
भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ शहराला लागून असलेल्या कंडारी शिवारातील एका भूखंडाच्या गेटचे कुलूप तोडून या जागेत बेकायदा घुसून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी सुनील रमेश अग्रवाल (रा.एस.के आॅईल मिलजवळ) यांनी फिर्याद दिल्यावरून रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आरपीआय )चे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजू सूर्यवंशी यांच्यासह २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, कंडारी शिवारातील शिवारातील गट क्रमांक १५९/१/२ मधील २०.५८ चौरस मीटर क्षेत्र हे सुशीलाबाई किसनलाल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात आले आहे. यासंदर्भात न्यायालयात खटला न्यायप्रविष्ट असून, मंगळवारी न्यायालयात चौकशी ठेवण्यात आली होती. चौकशीदरम्यान जागा आहे तशीच ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मात्र तरीही संशयित आरपीआय जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजू सूर्यवंशी, प्रकाश निकम हे जेसीबीसह २५-३० महिला व पुरुषांना घेऊन त्यांनी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व चाळीस वर्षांपूर्वीची निलगिरीची दोन व कडुनिंबाचे एक झाड तोडून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान केले, अशी फिर्याद अग्रवाल यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिली आहे. या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला सूर्यवंशी व निकम यांच्यासह इतरांवर गुन्हा रजिस्टर नंबर ४५७/१८, भा.दं.वि. कलम १४१, १४३, १४७, १५२, ४४७, ४२७ व ३४ प्र्रमाणे तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधात्मक कायदा १९८४ कलम ३ क्रिमिनल कायदा कलम ७ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील जोशी करीत आहे.