आजपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:20 PM2020-03-23T12:20:32+5:302020-03-23T12:20:48+5:30
जिल्हाधिकारी : कोरोनाबाबत दक्षता
जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांर्गत २३ मार्चपासून जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद करण्याचा निर्णय घेतला असून तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत. यामध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे वाहनेच सुरू राहतील, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी जीवनावश्यक वस्तू ज्यामध्ये भाजीपाला, दूध, किराणा सामान यांची वाहतूक करणारे वाहने सुरू राहणार आहेत.
साठा करू नका
जीवनावश्यक वस्तूंच्या दुकान, औषधी दुकान सुरू राहणार असल्याने त्यांचा साठा कोणीही करू नये, ही दुकाने उघडीच राहणार असल्याचे डॉ. ढाकणे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी : कोरोनाबाबत दक्षता
गर्दी टाळण्यासाठी २३ मार्चपासून कलम १४४ अर्थात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. मनपा हद्दीपासून दोन किमी अंतरावरील तसेच नगरपालिका व नगरपरिषदेच्या हद्दीतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने ३१ माचपर्यंत बंद असतील. हे आदेश औषध निर्मिती कारखाने व कृषि उपयोगी औषधे निर्माण कारखान्यांना लागू नसतील. जमावबंदी आदेशाची २३ मार्च रोजी पहाटे पाच पासून लागू असेल.
जमावबंदीतून यांना वगळले
जमावबंदीचे आदेशातून शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासकीय महामंडळाचे उपक्रम, आस्थापना, बीएसएनएल, इंटरनेट सेवा, वीज वितरण विभाग व त्यांची संलग्न कार्यालय (मात्र या ठिकाणी केवळ ५ टक्के कर्मचारी), वरील सेवांशी निगडीत माहिती तंत्रज्ञान विभाग (मात्र या ठिकाणी केवळ ५ टक्के कर्मचारी), अत्यावश्यक सेवा व सेवेतील व्यक्ती, रुग्णालये, पॅथॉलॉजी, दवाखाने, अत्यावश्यक सेवा पुरविणारे वाहने, वाहतूक व्यवस्था, रेल्वे स्थानक, बसस्थानक, विमानतळ, रिक्षा थांबे, बँक, वित्तीय संस्था, पेट्रोलपंप, किराणा, औषधालये, फळे, भाजीपाला, दूध विक्री दुकाने (गर्दी नसावी), गर्दी टाळून अंत्यविधी, प्रसार माध्यमे कार्यालये, घरपोच सेवा देणाºया आस्थापना यांना वगळण्यात आले.