आरटीओत जनतेशी निगडित कामे बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:17 AM2021-05-06T04:17:32+5:302021-05-06T04:17:32+5:30
३० जूनपर्यंत मुदतवाढ : फक्त अत्यावश्यक कामे जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरटीओ कार्यालयात सामान्य जनतेशी निगडित सर्व कामे ...
३० जूनपर्यंत मुदतवाढ : फक्त अत्यावश्यक कामे
जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरटीओ कार्यालयात सामान्य जनतेशी निगडित सर्व कामे बंद ठेवण्यात आलेली आहेत. ज्या वाहनांची योग्यता प्रमाणपत्र, वाहन परवाना व इतर कामांची मुदत ३० मार्चपर्यंत होती, अशा वाहनांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
वाहन नोंदणी, वाहन परवाना हस्तांतरण आदी जनतेशी निगडित कामे आहेत, ती बंद ठेवण्यात आली आहेत. अत्यावश्यक सेवेतील ट्रक, रुग्णवाहिका यांची नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र आदी कामे सुरू असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शासकीय कार्यालयात पाच ते पंधरा टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आलेली आहे. आरटीओची सर्व कामे यामुळे ठप्प झालेली आहेत. ज्या वाहनांची नोंदणी, कर, फिटनेस, वाहन परवाना आदी तत्सम कामांची मुदत संपली असली तरी ती ३० जूनपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. बहुतांश कामे ऑनलाइन होत असल्याने नागरिकांना त्याचा उपयोग करता येणार आहे. ३० जूनपर्यंत शासनाचे नवीन नियम आले नाहीत तर तेव्हापासून नियमित कामे सुरू होतील, अशीच परिस्थिती असली तर पुन्हा मुदतवाढ मिळू शकते.
दरम्यान, कोरोनामुळे जनहिताची कामे बंद असल्याने त्याचा महसुलावरही थेट परिणाम होत आहे.