सार्वजनिक बांधकाम विभागाचा पर्यावरणपूरक उपक्रम, प्रत्येक अभियंत्याला हजार झाडांचे उद्दिष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 11:50 AM2018-07-04T11:50:45+5:302018-07-04T11:51:41+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या पुढाकाराने पर्यावरण रक्षणाची चळवळ सार्वजनिक बांधकाम विभागात राबविली जात आहे.
- सुशील देवकर
जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या पुढाकाराने पर्यावरण रक्षणाची चळवळ सार्वजनिक बांधकाम विभागात राबविली जात असून जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यातील ८० कनिष्ठ अभियंत्यांनी रस्त्याच्या कडेला आपोआप उगवलेली प्रत्येकी हजार-दोन हजार झाडे जगविण्यासाठी वर्षभर प्रयत्न केले. त्यापैकी किमान सुमारे ५० हजार झाडे जगली आहेत.
शासनातर्फे पर्यावरण संवर्धनासाठी शतकोटी वृक्षलागवडीसारख्या योजना राबवित आहे. त्यासाठी लोकसहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याबरोबरच शासकीय विभागांनाही वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले जात आहे. बहुसंख्य विभागांकडून हे उद्दिष्ट थातूरमातूर वृक्षलागवड करून पूर्ण केले जाते. मात्र जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र या उद्दिष्टाव्यतिरिक्त रस्त्याच्या कडेला आपोआप उगविलेल्या रोपांची देखील निगा राखून ते जगविण्याचा प्रयत्न स्वयंस्फूर्तीने राबविला आहे.
त्यात प्रत्येक अभियंता त्याच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांच्या कडेला तसेच शासकीय इमारतींच्या आवारात आपोआप उगवलेल्या झाडांना आळे करून त्यांच्या फांद्या खालून छाटून त्याला लाल रिबीन बांधतात. फांद्या छाटल्याने झाडाची उंची लवकर वाढते. तसेच आळे केल्याने पावसाचे पाणी त्यात साठून त्या झाडाला जगण्यासाठी पाणी उपलब्ध होते. त्यामुळे काही महिन्यांमध्येच ते झाड वाढून मोठे होते. अशा प्रकारे जिल्ह्यातील ८० अभियंत्यांनी सहभाग घेत १ लाखाच्या आसपास झाडे जगवण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी ५० हजार झाडे जगली असून त्यांची चांगली वाढ झाली आहे. झाडाला बांधलेल्या रिबीनवरून काही दिवसांनी झाड किती वाढले ते लक्षात येते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कागदाचाही पुनर्वापर
बैठकांच्या अहवालांसाठी वापरलेले कागद काही दिवसांनी निरुपयोगी ठरतात. ते रद्दीत देण्याऐवजी वापरलेल्या बाजूला काट मारून पाठीमागील कोऱ्या बाजूचा (पाठकोरे) वापरही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात होत आहे. त्यामुळे कागद तयार करण्यासाठी होणारी झाडांची कत्तल वाचेल, असा उद्देश असल्याचे व आवड म्हणून हा उपक्रम राबवित असल्याचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी सांगितले.