जामनेर तालुकयात सार्वजनीक बांधकाम विभागाची कामे संथ गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 03:21 PM2020-08-03T15:21:16+5:302020-08-03T15:22:14+5:30
जि.प.च्या कामांना निधीचा ब्रेक
जामनेर : जिल्हा परिषद बांधकाम विभागाकाडून ग्रामीण भागात रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे केली जातात. अशी सध्या आठ ठिकाणाची कामे मंजूर आहे, मात्र निधी नसल्याने कामे सुरु होऊ शकली नाही. पावसाळ्यात कामे बंद असल्याचे सांगण्यात आले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन राज्य मार्ग व जिल्हा मार्गांची कामे केली जात असून त्यापैकी सध्या तालुक्यात मुक्ताईनगर ते पहूर रस्त्याचे काम सुरु आहे. हे काम अत्यंत संथ गतीने तब्बल तीन वर्षांपासून सुरु आहे.
जळगाव औरंगाबाद रस्त्याचे तालुक्यातील वाकोद पर्यंतचे काम हनुमानाच्या शेपटी प्रमाणे लांबतंच आहे. खोदलेल्या रस्त्यामुळे गेली दोन पावसाळे वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. ठेकेदाराची मनमानी व अधिकाऱ्यांचे मौन यामुळे कुणाचेही याकडे लक्ष नाही.
जामनेर -फत्तेपूर -धामणगाव या जळगाव व बुलढाणा अशा दोन जिल्ह्याना जोडणाºया प्रमुख रस्त्याचे काम सुरु आहे. या कामाबाबत काही गावातील नागरिकांनी तक्रारी करून देखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
विधान सभा निवडणुकीपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी भूमिपूजन केलेल्या कामांपैकी सुमारे ८० टक्के रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे. जि.प.बांधकाम विभागाकडून होत असलेल्या डांबरीकरणावर मोठा खर्च होत असला तरी काही दिवसातच रस्त्याची दुर्दशा होते, असे का ? असाही प्रश्न उपस्थित होते.