जळगावात भरपावसात उमेदवारांकडून प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 01:49 PM2018-07-23T13:49:50+5:302018-07-23T13:51:12+5:30
दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतनाही त्याची पर्वा न करता रविवारी सुट्टीच्या दिवसाची संधी साधत सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी दिवसभर धूमधडाक्यात जोरदार प्रचार केला.
जळगाव : दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतनाही त्याची पर्वा न करता रविवारी सुट्टीच्या दिवसाची संधी साधत सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी दिवसभर धूमधडाक्यात जोरदार प्रचार केला. ढोलताश्यांचा गजर व फटाक्यांची आतशबाजी करीत उमेदवार गल्लीबोळात प्रचार करीत होते.
सकाळपासूनच प्रचाराचा धडाका
मनपा निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत अनिश्चिततेचा कालावधी असल्याने अर्ज दाखल करून माघारी झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराला प्रारंभ झाला. त्यामुळे १७ जुलै पासून ३० जुलै पर्यंत जेमतेम १३ दिवसांचाच कालावधी उमेदवारांजवळ आहे. त्यातच इतर दिवशी नागरिक कामानिमित्त बाहेर गेलेले असतात. सुटीच्या दिवशीच बहुतांश नागरिकांची भेट होऊ शकते. त्यामुळे उमेदवारांनी सकाळी ८ वाजेपासून प्रचाराचा धडाका सुरु केला.
पावसातच केला प्रचार
रविवार, २२ रोजी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे उमेदवार व कार्यकर्त्यांची पंचाईत झाली. मात्र जेमतेम दोनच रविवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हाती असल्याने वेळ वाया घालवून चालणार नाही, असा विचार करीत उमेदवार व कार्यकर्त्यांनी पाऊस थोडा कमी होताच प्रचाराला सुरूवात केली.
कॉलन्या, नगरांमध्ये प्रचंड वर्दळ
प्रचारात सहभागी झालेल्या काही कार्यकर्त्यांनी छत्रीचा आधार घेत प्रचार केला. तर काहींनी पावसातच भिजत प्रचार केला. सकाळी ८ ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत विविध कॉलन्या, नगरांमध्ये कार्यकर्त्यांचा ताफा दिसत होता. संपूर्ण कॉलनी, नगर हे उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी पिंजून काढले. उमेदवारांच्या आधी रिक्षा फिरत होत्या, त्याद्वारे उमेदवाराचा प्रचार केला जात होता.
आडोशाला उभे राहून पाहिली वाट
सकाळी नेहमीप्रमाणे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचाराला निघण्यासाठी तयार झाले. मात्र पाऊस सुरू असल्याने छत्री, रेनकोटचा आधार घेत प्रभागातील प्रचार कार्यालयापर्यंत पोहोचले. तेथे काही जण कार्यालयात तर उर्वरीत आजूबाजूला आडोशाला उभे राहून पाऊस थांबण्याची वाट पहात उभे होते. मात्र पाऊस थांबण्याची चिन्ह नसल्याने पाऊस कमी होताच उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारासाठी रवाना झाले.