डॉक्टर असल्याचे सांगून महिला रूग्णांना तपासणाऱ्या ‘मुन्नाभाई’ला पब्लिक मार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 12:38 PM2020-02-05T12:38:01+5:302020-02-05T12:38:45+5:30
‘सिव्हील’मधील धक्कादायक घटना, पालकांच्या लक्षात आल्याने गोंधळ; पोलिसांच्या दिले ताब्यात
जळगाव : जिल्हा रूग्णालयातील बालक व महिलांच्या कक्षात डॉक्टर बनून रूग्णांना तपासणाºया मुकेश चंद्रशेखर कदम (२५, रा.मोहाडी, ता.जळगाव) या बोगस डॉक्टर अर्थात मुन्नाभाईला मंगळवारी दुपारी अडीच वाजता ‘पब्लीक’ चोप देण्यात आला. त्यानंतर जिल्हा पेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले़ या तरूणाजवळ इंजेक्शन व ह्दयाचे ठोके तपासण्याचे यंत्र (स्टेथोस्कोप)होते असेही उपस्थितांनी सांगितले़ दरम्यान, याबाबत कोणीही तक्रार दिली नाही, त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई करुन संशयिताला सोडून देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी ‘लोकमत’ ला दिली.
यावल तालुक्यातील एक १२ वर्षाची बालिका जिल्हा रूग्णालयात बालकांच्या कक्षात दाखल आहे. मंगळवारी दुपारी मुकेश कदम हा तरूण गळ्यात स्टेथोस्कोप व तोंडाला मास्क लावून वार्डात आला़ त्याने अत्यंत संतप्त होत, नातेवाईकांना बाहेर जाण्यास सांगून तो बालकांना तपासू लागला तो अतिशय उद्धट बोलत असल्याने बालिकेच्या वडीलांनी एका परिचारिकेला हा डॉक्टर आहे का? अशी विचारणा केली़ तो डॉक्टर नसल्याची खात्री झाल्यानंतर नातेवाईकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याने पळ काढला, आरडा-ओरडा झाल्यानंतर वार्डातील अन्य डॉक्टरही त्याच्या मागे पळाले़ नेत्र कक्षाच्या समोर त्याला पकडण्यात आले़ त्यानंतर त्याला थेट पोलीस चौकीत आणण्यात आले़ या ठिकाणी त्याला चोप देण्यात आला़ यानंतर पंधरा मिनिटांनी जिल्हा पेठ पोलिसांनी या चौकीत येत त्याला ताब्यात घेतले़ दहा ते पंधरा मिनिटे पोलीस चौकीसमोर मोठा गोंधळ सुरू होता़ या तरूणाने महिलांच्या वार्डात काही महिलांची छेड काढल्याचेही लोकांनी सांगितले़ अशा घटनांमुळे डॉक्टर बदनाम होत असल्याचा संताप डॉक्टरांनी व्यक्त केला़
महिला व बालकांचा वॉर्ड असुरक्षित
जिल्हा सामान्य रूग्णालयात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे़ या आधीही जिल्हा रूग्णालयातून एका बालकाचे अपहरण झाले होते़ यासह आपत्कालीन कक्षात एका रूग्णाने गोंधळ घातला होता़ असे गंभीर प्रकार घडूनही रूग्णालयातील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत झालेली नसून सुरक्षेच्या बाबतीत रुग्णालय प्रशासन गंभीर नसल्याचे वारंवार समोर आले आहे़ नातेवाईकांच्या लक्षात हा प्रकार आला नसता तर काहीही अनर्थ होण्याची शक्यता नाकारता आली नसती.
बापाला शिकविणार का?.. मुकेश याच्या टी शर्टवर ‘बापाला शिकविणार का? असे नाव टाकले आहे. आपण एका राजकीय पुढाºयाशी संबधित असल्याचे तो सांगत होता़ तुम्ही त्यांना बोलवा, असे तो सांगत होता़ पोलिसांनी त्याला हा स्टेथोस्कोप कोणाचा हे वारंवार विचारले मात्र, त्याने सांगण्यास नकार दिला व आपले आॅपरेशन झाल्याचेही तो सांगत होता़
संशयित तरुणाला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनाही बोलावण्यात आले. मात्र त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. डॉक्टर किंवा अन्य कोणत्याही कर्मचाºयाने तक्रार द्यावी म्हणून रुग्णालय प्रशासनाला सांगितले, परंतु त्यांनीही तक्रार दिली नाही. त्यामुळे आम्हीच त्याच्याविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई केली नंतर सायंकाळी त्याला सोडून दिले.
-अकबर पटेल, पोलीस निरीक्षक, जिल्हा पेठ