पुजाराला झालीय घाई, पण मिळणार का संधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:15 AM2021-04-11T04:15:35+5:302021-04-11T04:15:35+5:30
३ मे २०१४ ला किंग्ज इलेव्हन पंजाबकडून अखेरचा आयपीएल सामना खेळणाऱ्या पुजाराला या आयपीएल सत्रात तरी संधी मिळण्याची आशा ...
३ मे २०१४ ला किंग्ज इलेव्हन पंजाबकडून अखेरचा आयपीएल सामना खेळणाऱ्या पुजाराला या आयपीएल सत्रात तरी संधी मिळण्याची आशा आहे. त्याला चेन्नई सुपरकिंग्जने करारबद्ध केले असले तरी त्याला संघाकडून किती सामने खेळायला मिळतात, याची उत्सुकता आहे.
कसोटी खेळाडू म्हणून त्याने भारतीय कसोटी संघात आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र त्याला एकदिवसीय किंवा टी२० सामन्यांसाठी कधीही चांगली संधी मिळाली नाही.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्ससोबत होणार आहे.
त्यात आधी चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात असलेल्या पुजाराने शनिवारी दुपारी ट्विट केले की”आमच्या अभियानाला सुरूवात होणार आहे. मी आता वाट बघू शकत नाही. संघ त्यासाठी तयार आहे.’ त्यासोबतच पुजाराने आपला बॅटसोबतचा फोटो देखील पोस्ट केला आहे.
पुजाराने आयपीएलमध्ये ९९.७४ च्या स्ट्राईकरेटने धावा काढल्या आहेत. त्यात त्याने ५० चौकार आणि चार षटकार देखील लगावले. मात्र कसोटीपटू म्हणून ओळख मिळवल्यावर त्याला टी२० च्या दृष्टीने आयपीएलच्या कोणत्याही संघाने २०१४ नंतर खेळण्याची संधी दिली नाही. मधली काही वर्षे तर त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. यंदा त्याला चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतले आहे. त्यामुळे यंदा तरी त्याला संधी मिळणार का, असा प्रश्न आहे.