आयातीच्या अमर्याद परवानगीसह साठ्याच्या निर्बंधामुळे डाळ उद्योग संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:11 AM2021-07-12T04:11:56+5:302021-07-12T04:11:56+5:30

विजयकुमार सैतवाल जळगाव : कडधान्याच्या आयातीवरील निर्बंध पूर्णपणे उठविण्यासह कडधान्य साठ्यावर मर्यादा आणल्याने कडधान्याचे भाव प्रति क्विंटल ३०० रुपयांनी ...

Pulses industry in crisis due to stock restrictions with unlimited import permits | आयातीच्या अमर्याद परवानगीसह साठ्याच्या निर्बंधामुळे डाळ उद्योग संकटात

आयातीच्या अमर्याद परवानगीसह साठ्याच्या निर्बंधामुळे डाळ उद्योग संकटात

googlenewsNext

विजयकुमार सैतवाल

जळगाव : कडधान्याच्या आयातीवरील निर्बंध पूर्णपणे उठविण्यासह कडधान्य साठ्यावर मर्यादा आणल्याने कडधान्याचे भाव प्रति क्विंटल ३०० रुपयांनी घसरले आहे. परिणामी डाळींचेही भाव गडगडल्याने डाळ उद्योग संकटात सापडला आहे. भाव कमी होत असल्याने व सरकारच्या धोरणामुळे डाळींचे उत्पादन कमी करण्यात येत आहे. यामुळे डाळींचे उत्पादन निम्म्यावर आले आहे.

कडधान्य साठवणूकबाबत केंद्र सरकारने अचानक बंधने लागू केली आहे. २ जुलै रोजी तसा अध्यादेश काढला. या अध्यादेशानुसार ठोक (होलसेल) विक्रेत्यांना २०० मेट्रिक टन साठा करता येणार आहे. यातही एका प्रकारच्या धान्याचा १०० मेट्रिक टनपेक्षा जास्त साठा राहणार नाही, अशी अट टाकण्यात आली आहे. या शिवाय किरकोळ विक्रेत्यांना पाच मेट्रिक टनपर्यंत साठा करता येणार आहे. या सोबतच दालमिल चालकांना त्यांच्या एकूण उत्पादनाच्या २५ टक्के किंवा तीन महिन्यांचा साठा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या आदेशामुळे जळगावसह राज्य तसेच देशभरात कृृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली. यामध्ये जळगावात एक दिवस बंद पाळण्यात आला होता. त्यानंतरही राज्यासह देशभरात विविध भागात बंद सुरूच आहे.

हमीभाव मिळणेही कठीण

केंद्र सरकारने आयातीवरील बंधने पूर्णपणे हटविले असून कितीही कडधान्याची आयात करता येत आहे. परिणामी आयात वाढल्याने कडधान्य तसेच डाळींच्या भावात घसरण होत असून शेतकऱ्यांच्याही मालाला भाव मिळणे कठीण होत आहे. यात भरीस भर म्हणजे गेल्या आठवड्यात साठ्याची मर्यादा आणल्याने आठवभरात कडधान्याचे भाव आणखी घसरले आहे.

उत्पादन केले कमी

बाजारपेठेत डाळींचे भाव कमी होत असल्याने व कडधान्याचेही भाव कमी होत असल्याने दालमिल चालकांनी आपले उत्पादन कमी केले आहे. परिणामी आठवडाभरात दालमिलचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. एकट्या जळगाव शहरात दररोज चार हजार टन होणारे डाळींचे उत्पादन आता दोन हजार टनावर आले आहे. देशभरात दररोज जवळपास अडीच लाख टन डाळींचे उत्पादन होते. तेदेखील दीड लाख टनावर आल्याचे दालमिल चालकांकडून सांगितले जात आहे.

आठवडाभरात कडधान्याच्या भावात झालेली घसरण (क्विंटलमध्ये)

कडधान्य-आठवडाभरापूर्वी-सध्याचे भाव-जाहीर हमीभाव

हरभरा-४९००-४६००-५२००

तूर-६२००-५९००-६०००

मूग-६८००-६५००-७१००

उडीद-६३००-६२००-६०००

सरकारचे धोरण मारक

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सरकार आयात-निर्यातीविषयी तसेच व्यापार क्षेत्राविषयी वारंवार धोरण बदलवित असल्याने दालमिल, व्यापार क्षेत्र, कृषी क्षेत्र संकटात येत असल्याचा आरोप केला जात आहे.

कडधान्याच्या आयातीवरील निर्बंध उठविल्याने व साठ्यावर बंधने घातल्याने कडधान्यासह डाळींचे भाव घसरत आहे. यामुळे उत्पादन कमी होत आहे. पुरवठा सुरळीत असताना साठा मर्यादेची आवश्यकताच नव्हती. ग्राहकांना कमी भावात माल देणे व शेतकऱ्यांनाही योग्य भाव देणे या दोघांमध्ये सरकारचे वारंवार निर्णय बदलत असल्याने उद्योगात मोठी कसरत करावी लागत आहे.

- प्रदीप अग्रवाल, उपाध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.

कडधान्याच्या साठवणुकीवर मर्यादा आणल्याने व्यापारी वर्ग माल विक्रीवर भर देत आहे. त्यामुळ‌े आठवडाभरात कडधान्याच्या भावात घसरण झाली आहे. साठा मर्यादेविषयीचे आदेश मागे घेण्यासाठी व्यापारी संघटनांची सरकारशी बोलणी सुरू आहे. आदेश मागे न घेतल्यास देशभरात व्यापारी बंदच्या तयारीत आहे.

- शशिकांत बियाणी, अध्यक्ष, जळगाव मार्केट यार्ड असोसिएशन.

Web Title: Pulses industry in crisis due to stock restrictions with unlimited import permits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.