डाळींच्या उत्पादनात २५ टक्क्याने घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:41 PM2018-11-02T12:41:46+5:302018-11-02T12:42:15+5:30
कडधान्याची आवक घटली
जळगाव : कमी पावसामुळे कडधान्याची आवक घटल्याने त्याचा फटका दालमिललादेखील बसू लागला असून आतापासूनच दालमिलचे उत्पादन तब्बल २५ टक्क्याने घटले आहे. त्यात विदेशातून होणारी कच्च्या मालाची आवकही बंद असल्याने डाळ उत्पादनावर मोठा परिणाम होऊन डाळींचे भावदेखील वाढू लागले आहे. सलग तीन आठवड्यांपासून डाळींचे भाव वाढतच असून या तीन आठवड्यात डाळींचे भाव थेट ८०० ते ९०० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहेत.
यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून उत्पादन घटन्यासह दर्जावरही परिणाम झाला आहे. उडीद, मुगाला शेवटच्या टप्प्यात पाण्याची आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने उडीद, मुगाचे उत्पादन कमी होऊन आवक घटल्याने दालमिलमध्ये कच्च्या मालाची चणचण भासू लागली आहे.
उत्पादन ७५ टक्क्यांवर
देशातील डाळ उत्पादनात जळगावचा मोठा वाटा असून येथील डाळ देशातील विविध भागासह विदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. त्यामुळे येथील औद्योगिक वसाहतीमधील डाळ उद्योग हा महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र यंदा वरुणराजाच्या अवकृपेने या उद्योगावर मंदीचे ढग ओढावले जात आहे. जळगावात दररोज साधारण ५ हजार क्विंटल डाळीचे उत्पादन होते. मात्र सध्या कडधान्याची आवक घटल्याने या उत्पादनात थेट २५ टक्क्याने घट झाली आहे. ५ हजार क्विंटलपैकी आता दररोज ३७०० ते ३७५० क्विंटल डाळीची निर्मिती होत आहे.
आयात बंदीची भर
देशात एकतर कडधान्याचे उत्पादन कमी आल्याने त्यात विदेशातून येणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवर बंदी असल्याने कच्च्या मालाची कमतरता भासण्यास अधिकच मदत होत आहे. त्यामुळे या सर्वांचा जळगावातील ५५ ते ६० दालमिलला फटका बसत आहे. परिणामी दालमिलचालक चिंतीत झाले असून २००६मधील निर्यातबंदी नंतर झालेल्या स्थितीची आठवण या निमित्ताने दालमिल चालकांना होत आहे.
मागणी वाढली
पावसाळ््यामध्ये डाळींना मागणी कमी असल्याने तिचे भावदेखील स्थिर होते. मात्र सध्या आवक कमी असताना मागणीही वाढल्याने डाळींचे भाव वाढण्यास अधिक मदत होत आहे. कमी पावसामुळे खरीपापाठोपाठ रब्बी हंगामावरही परिणाम होण्याची चिन्हे असल्याने रब्बी हंगामातील हरभºयाच्या उत्पादनावरही परिणाम होणार असल्याचे संकट दालमिलवरदेखील राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
मोठी भाववाढ
तीन आठवड्यांपूर्वी ६२०० ते ६६०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ७१०० ते ७६५० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीतही ५५० ते ६०० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन ती ४७०० ते ४८०० रुपयांवरून ५३०० ते ५३५० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. अशाच प्रकारे ५२०० ते ५५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ५४०० ते ५५५० तर तूरडाळदेखील ५५०० ते ६००० रुपये प्रती क्विंटलवरून ५७०० ते ६१५० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे.
कडधान्याची आवक घटल्याने दालमिलमधील उत्पादन २५ टक्क्याने कमी झाले आहे. त्यात कच्च्या मालाची आयात बंद असल्याने अधिकच परिणाम होत आहे.
- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.
डाळींची आवक कमी व मागणी जास्त असल्याने डाळींचे भाव वाढत आहे. त्यात उडीद व मुगाच्या डाळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन