सिंचनासाठी पाण्याचा उपसा सुरु, २५ शेतकऱ्यांना कारवाईचा शॉक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2023 02:44 PM2023-10-17T14:44:35+5:302023-10-17T14:45:38+5:30
हातगाव, म्हसवे, अंजनी क्षेत्रात भरारी पथकांच्या धाडी
कुंदन पाटील, जळगाव : यंदा पावसाअभावी विहिरीतील जलसाठ्याने तळ गाठले आहे. तशातच ऑक्टोबर हिटच्या तडाख्यात पिकांची स्थिती नाजूक होत असताना गिरणासह अन्य जलप्रकल्पातून सिंचनासाठी शेतकऱ्यांनी पाण्याचा उपसा सुरु केला आहे. भविष्यात टंचाईचे टचके बसणार असल्याची दाट शक्यता असताना आरक्षित पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात ४ ठिकाणी धाडी टाकून जवळपास २५ शेतकऱ्यांवर कारवाई केली आहे.
चाळीसगाव, पारोळा, एरंडोल, पाचोरा, अमळनेर व धरणगाव तालुक्यात पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. मात्र विहिरीतील जलसाठा आटल्याने अनेकांनी धरण, तलावकाठी विद्युत मोटारींच्या माध्यमातून पाण्याचा उपसा सुरु केला आहे. त्यामुळे गिरणा पाटबंधारे विभागासह अन्य यंत्रणांनी कारवाईचे सत्र हाती घेतले आहे.
१० मोटारी जप्त
हातगाव (चाळीसगाव) व म्हसवे (पारोळा) या दोन्हीठिकाणाहून १० विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. तर अंजनी (एरंडोल) धरणाच्या बॅकवॉटरमधून पाण्याचा उपसा करणाऱ्या १२ विद्युत मोटारी प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. शेतकऱ्यांना ताकीद देऊन या मोटारी परत करण्यात आल्या आहेत. देवळी-भोरस (चाळीसगाव) भागातही शेतकऱ्यांना मोटारी उचलण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे.
पथकांकडून तपासणी
गिरणा पाटबंधारे विभागाचे स्थानिक शाखाधिकारी, कॅनाल निरीक्षक, स्थानिक पोलीस पाटील, सरपंच, महसुल विभागाचा प्रतिनिधीचा समावेश असलेले पथके प्रकल्पातील जलसाठ्यांवर लक्ष ठेऊन आहेत. विद्युत मोटारी जप्त करण्यासाठी वीज कंपनीचे प्रतिनिधी वेळीच दाखल होत नसल्याने कारवाईत अडचण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात गिरणा पाटबंधारे विभागाने वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.त्यानुसार तांत्रिक कारवाईसाठी मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
यंदा प्रकल्पांमधील जलसाठा पुरेसा नाही. म्हणून पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सार्वजनिक हित लक्षात घेत सिंचनासाठी पाण्याची उचल करु नये. तसे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. -देवेंद्र अग्रवाल, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग.