एटीएमचा पोलिसांकडून पंचनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:21 AM2021-06-16T04:21:52+5:302021-06-16T04:21:52+5:30
जळगाव : शिव कॉलनीजवळील स्टेट बँकेचे एटीएम व सीडीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर जिल्हा पेठ पोलिसांनी सोमवारी घटनास्थळाचा पंचनामा ...
जळगाव : शिव कॉलनीजवळील स्टेट बँकेचे एटीएम व सीडीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर जिल्हा पेठ पोलिसांनी सोमवारी घटनास्थळाचा पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेजवरून संशयित निष्पन्न होतो का? याची पडताळणी केली. दरम्यान, हरियाणा व आंध्र प्रदेशात एटीएम फोडणारी टोळी असून त्यांच्याकडूनच हा प्रयत्न झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
सोनसाखळी लूट प्रकरणात धागेदोरे नाही
जळगाव : क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगून पिंप्राळ्यातील भवानी माता मंदिर व इच्छा देवी चौक परिसरात दोघांना लुटल्याच्या घटनेप्रकरणी सोमवारी पोलिसांनी दोन्ही मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. रेकॉर्डवरील गुन्हेगार सध्या कुठे आहेत, काय करताहेत, याची माहिती घेतली. ठोस असे काही धागेदोरे मिळाले नसल्याची माहिती तपासी अंमलदार संजय सपकाळे यांनी दिली.
अजिंठा चौक परिसरात वेटरकडून ग्राहकावर हल्ला
जळगाव : अजिंठा चौक परिसरातील एका हॉटेलमध्ये मद्यप्राशन केल्यानंतर बिलाच्या कारणावरून वाद होऊन वेटरने एका तरुणाच्या डोक्यात बीअरची बाटली टाकून जखमी केल्याची घटना सोमवारी दुपारी ४ वाजता घडली. हा तरुण व त्याचे काही मित्र या हॉटेलमध्ये मद्यप्राशन करायला बसले होते. तेथे १३०० रुपये बिल अदा करण्यात आले. त्याच कारणावरून वाद होऊन वेटरने मद्यपी तरुणावर हल्ला केला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आज धक्का मारो आंदोलन
जळगाव : बहुजन मुक्ती पार्टीतर्फे महागाईच्या विरोधात आज १५ जून रोजी सकाळी ११ वाजता स्वातंत्र्य चौक जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धक्का मारो आंदोलन केले जाणार आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तर राज्य सरकारने वीजबिल व खाद्यतेलात भरमसाट वाढ केली आहे. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विजय सुरवाडे यांनी कळविले आहे.