एस.टी.संपाचा फटका, चिमुकल्याच्या ओढीने मातेची पुणे ते जळगाव दुचाकीने धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:12 PM2017-10-26T12:12:43+5:302017-10-26T12:18:29+5:30
400 कि.मी.चा टप्पा गाठला साडे आठ तासात
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 26 - गेल्या आठवडय़ात एस.टी. महामंडळाच्या कर्मचा:यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला. मात्र यावर मात करीत जळगावातील माहेरवाशीण असलेल्या एका विवाहितेने पोटचा गोळा जळगावात असल्याने थेट दुचाकीनेच पुणे ते जळगाव हा 400 किमीचा प्रवास स्वत: दुचाकी चालवत साडे आठ तासात पूर्ण केला व चिमुकल्याची भेट घेतल्याची घटना घडली.
जळगावातील माहेर असलेली एक महिला सध्या पुणे स्थायिक असून त्या खाजगी कंपनीत नोकरी करतात. त्यांचा भाऊ व आईदेखील पुण्यातच राहतात तर पती भारतीय नौदलात विशाखापट्टनम् येथे नोकरीला आहेत. दिवाळी सण असल्याने त्यांच्या आई, भाऊ व तीन वर्षाचा मुलगा दिवाळीच्या आठवडाभरापूर्वीच जळगावला आले. सुट्टी न मिळाल्याने त्या महिलेला त्यांच्यासोबत येता आले नाही. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी येण्याचे त्यांनी ठरविले. पहाटे चार वाजताच पुणे येथून दुचाकीने निघाल्या. या वेळी त्यांनी पँट, शर्ट व हेल्मेट अशा पुरुषी वेषात प्रवासास सुरुवात केली. कोठेही न डगमगता त्यांनी धाडसाने प्रवास केला. कुटुंबियांना त्रास नको म्हणून त्या महिलेने नाव न देण्याची विनंती ‘लोकमत’ला केली.
ज्या वेळी त्यांनी येण्याची तयारी केली त्या वेळी एस.टी. कर्मचा:यांचा संप होता. त्यात ट्रॅव्हल्स फुल्ल व भाडे भरमसाठ. तेवढे पैसे देऊनही जागा मिळत नव्हती. त्यामुळे चिमुकल्याची ओढ मातेला चैन पडू देत नव्हती. त्यामुळे या मातेने थेट दुचाकीनेच जळगाव गाठायचा निश्चय केला.