पुणे पोलिसांनी मागविली ‘मविप्र’ ची कुंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:16 AM2021-01-22T04:16:18+5:302021-01-22T04:16:18+5:30

जळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्थेतील वादाचे प्रकरण पुन्हा चर्चेला आले असून संस्थेची कुंडली काढण्यासाठी पुणे पोलिसांचे एक पथक ...

Pune police ordered MVP's horoscope | पुणे पोलिसांनी मागविली ‘मविप्र’ ची कुंडली

पुणे पोलिसांनी मागविली ‘मविप्र’ ची कुंडली

Next

जळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्थेतील वादाचे प्रकरण पुन्हा चर्चेला आले असून संस्थेची कुंडली काढण्यासाठी पुणे पोलिसांचे एक पथक गुरुवारी शहरात दाखल झाले. या पथकातील अधिकाऱ्यांनी सहायक पोलीस आयुक्तांच्या नावे पत्रव्यवहार करून सन २०१२ पासून तर आजपर्यंतची संपूर्ण माहिती २५ जानेवारीपर्यंत मागविली आहे. दरम्यान, पोलीस ठाण्यांमध्येही दाखल गुन्ह्यांची माहिती या पथकाकडून संकलित केली जात आहे.

अ‍ॅड.विजय पाटील यांनी गेल्या महिन्यात माजी मंत्री गिरीश महाजन, मविप्र संस्थेचे मानद सचिव नीलेश भोईटे, तानाजी भोईटे, विरेंद्र भोईटे यांच्यासह २९ जणांविरुध्द निंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार हा गुन्हा पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात वर्ग झाला आहे. याच गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांचे दोन अधिकारी, कर्मचारी अशा चार जणांचे एक पथक गुरुवारी दाखल झाले.

पथकाने गुन्ह्याकामी आवश्यक माहिती मिळावी म्हणून मविप्रसंदर्भात जिल्हाभरात एकत्रित दाखल गुन्हे, त्याचा तपास याबाबत पोलीस अधीक्षकांना पत्र दिले. जिल्हापेठ पोलिसांनी कुणाच्या सांगितल्यावरून संस्थेवर पूर्णवेळ पोलीस बंदोबस्त ठेवला होता. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे व त्याच्या माहितीबाबत जिल्हापेठ पोलिसांना पत्र दिले. त्याशिवाय मविप्र या संस्थेअंतर्गत नूतन मराठा महाविद्यालयासह जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, संस्थेतील प्रशासक नियुक्ती, यासह संस्थेची निवडणूक, कार्यकारिणी, शैक्षणिक संस्थांमधील नियुक्त्या, संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, पगारासह विविध तांत्रिक सोपस्कार कुणाच्या पत्रांद्वारे बदलण्यात आले याची याबाबत माहितीसाठी पथकाने साहाय्यक शिक्षण सहसंचालक सतीश देशपांडे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांनाही पत्रव्यवहार केला आहे.

आर्थिक व्यवहारासह निवडणुकीचीही माहिती

संस्थेचे आर्थिक व्यवहार संचालक मंडळाशिवाय दुसऱ्या गटाच्या नावे करावे म्हणून कोणाचे पत्र होते, याची माहिती घेण्यासाठी मविप्रचे खाते असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलाही पत्र देण्यात आले आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेवर प्रशासक बसविण्यात आला होता. सहकार विभागाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करून तेथे निवडणुका घेतल्या होत्या. संस्थेची सहकार कायद्यानुसार निवडणूक केव्हा, कोणत्या कालावधीसाठी घेण्यात आली होती, याबाबत जिल्हा उपनिबंधकांनाही पत्र देण्यात आले आहे.

कोट...

आज रावेरला असल्याने कार्यालयात नव्हतो. त्यामुळे पुणे पोलिसांचे पत्र आले किंवा नाही याबाबत सांगता येणार नाही. हा गुन्हा पुण्यात वर्ग झालेला आहे. पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन पुण्याच्या पथकाने पत्र दिले असतील.

-डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक

Web Title: Pune police ordered MVP's horoscope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.