पारोळ्यात १० दुकानांवर दंडात्मक कारवाई, १२ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 09:38 PM2021-05-13T21:38:56+5:302021-05-13T21:39:40+5:30
पारोळा येथे संचारबंदीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० दुकानांवर दंडात्मक कारवाई करीत १२ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : अक्षय तृतीया व रमजानच्या पार्श्वभूमीवर साहित्य व किराणा बाजार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी बाजारपेठेत झाली होती. लादण्यात आलेले निर्बंधचे उल्लंघन होत होते. संचारबंदीत अनावश्यक दुकाने बंद ठेवण्याचा नियम असताना पारोळा बाजारपेठेत सर्व प्रकारची दुकाने सर्रास सुरू होती. संचारबंदीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० दुकानांवर दंडात्मक कारवाई करीत १२ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यात ३ दुकानांना सीलही लावण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी आहे. अत्यावश्यक सेवेत असलेली दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी आहे. त्यानंतर सर्व दुकाने बंद करून कडकडीत बंद पाळावा, असा निर्देश असताना पारोळा बाजारपेठेत सर्व प्रकारची दुकाने सर्रासपणे सुरू होती. यावेळी मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील या पालिकेत चारचाकीने येत असताना त्या सर्व प्रकारची दुकाने उघडी दिसली. त्यांनी कजगाव चौफुलीवरून आपल्या वाहनातून उतरून पायी कार्यलयात जाताना जे अनावश्यक दुकान उघडे दिसले. त्या सर्व दुकानांवर दंडात्मक कारवाई करीत काही दुकाने सील लावली, त्या स्वतः रस्त्यावर कारवाईसाठी उतरल्यावर दुकानदारांनी आपापली दुकाने पटापट बंद करून घेतली. बाजारपेठेत सीईओ आल्यास दुकाने बंद करा, असा आवाज व्यापारी एकमेकांना देत १० मिनिटांतच संपूर्ण बाजारपेठेतील दुकाने बंद झाली. बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट झाला. जे आवश्यक दुकाने ११ वाजेपर्यंत बंद झाली नव्हती, त्यांच्यावर यावेळी कारवाई करण्यात आली.
बाजारपेठेत भाजीपाला, फळे, पाव व इतर साहित्य विक्री करणारे ठेलागाडीधारकांनाही काही मिनिटांत बाजारपेठेतून काढून देत संपूर्ण बाजारपेठ ठेलागाडीमुक्त केली. यावेळी कारवाईसाठी स्वतः मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, अभियंता अभिषेक काकडे, राहुल साळवे, हिंमतराव पाटील, पो. हे. कॉ. सुनील साळुंखे, जितेंद्र चौधरी, रवींद्र पाटील, रमेश तीलकर, सचिन चौधरी, किरण खंडारे, विश्वास पाटील इत्यादी होते.
आखाजी सण आहे, सवलत द्या
खान्देशात आखाजी हा सर्वांत मोठा सण आहे. त्यासोबत रमजान ईद आहे. या दोन्ही सणांना दोन्ही धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोरोनाचे सावट जरी या सणांवर असले तरी बाजार खरेदीसाठी गर्दी मोठ्या प्रमाणात आहे; परंतु वेळेअभावी ग्रामीण भागातील अनेक जणांना साहित्य व बाजार न करता परत जावे लागत आहे. तरी दोन- तीन दिवस वेळेत वाढ करून द्यावी व सर्व प्रकारची दुकाने ९ ते २ यादरम्यान सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.