खान्देशात १० लाख कापूस गाठींची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:27 AM2021-02-06T04:27:48+5:302021-02-06T04:27:48+5:30
वर्ष - उद्दिष्ट - खरेदी २०१५-१६ - १५ लाख - १५ लाख ५० हजार गाठी २०१६-१७ - १५ ...
वर्ष - उद्दिष्ट - खरेदी
२०१५-१६ - १५ लाख - १५ लाख ५० हजार गाठी
२०१६-१७ - १५ लाख - १४ लाख ३४ हजार
२०१७-१८ - १५ लाख - १४ लाख ६० हजार
२०१८-१९ - १५ लाख - १४ लाख २५ हजार
२०१९-२० - १५ लाख - १३ लाख ७० हजार (कोरोना)
२०२०-२१ - १५ लाख - १० लाख - (जानेवारी अखेरपर्यंत)
खान्देशातील लागवड
२०१६ - ७ लाख ५० हजार हेक्टर
२०१७ - ७ लाख ९० हजार हेक्टर
२०१८ - ७ लाख २० हजार
२०१९ - ८ लाख २४ हजार
२०२० - ९ लाख २५ हजार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - यंदा खान्देशात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. त्यामुळे उत्पादन देखील १६ लाख गाठींपर्यंत जाईल असा अंदाज कॉटन क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला होता. मात्र, यंदा कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, आतापर्यंत खान्देशात १० लाख गाठींची खरेदी झाली आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत खरेदी होणाऱ्या कापसाच्या प्रमाणात यंदाचे प्रमाण हे २ ते ३ लाख गाठींनी कमी आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत खान्देशात १२ ते १३ लाख गाठींची खरेदी होत असते, यंदा मात्र १० लाख गाठींची खरेदी झाल्याची माहिती खान्देश जिनिंग असोशिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी दिली.
खान्देशात सुमारे ९ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही लागवड जास्त होती. त्यामुळे यंदा कापसाच्या उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज कापूस बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यामुळे यंदाचे उद्दिष्ट १६ लाख गाठींचे ठेवण्यात आले. त्यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात सीसीआय, पणन या शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. त्यामुळे हे उद्दिष्ट सहज होईल, असे चित्र होते. मात्र, १४ जानेवारीनंतर कापसाच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी अक्षर: पाठ फिरवली. आता खासगी जिनिंग असो वा शासकीय खरेदी केंद्र ओस पडलेले दिसून येत आहेत.
केवळ मोठ्या शेतकऱ्यांकडे माल शिल्लक
शेतकऱ्यांनी माल थांबविला असण्याची शक्यता कमीच असून, केवळ मोठ्या शेतकऱ्यांनी भाव वाढतील या अपेक्षेने कापूस विक्री केलेला नाही. ८५ ते ९० टक्के शेतकऱ्यांचा कापूस विक्री होऊन गेला आहे. त्यामुळे मालाची आवक वाढण्याची शक्यता कमीच आहे. तसेच गेल्यावर्षी कोरोनामुळे खरेदीदेखील लांबली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा भावाची वाट न पाहता, थेट विक्री केली.
शासकीय खरेदी बंद, खासगी जिनिंंगवर शुकशुकाट
मकर संक्रांतनंतर मालाची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे २९ जानेवारीपासून सीसीआयने खरेदी थांबविली आहे. तर खासगी जिनिंगमध्येदेखील भाव वाढल्याने काही दिवस शेतकऱ्यांचा रांगा लागल्या होत्या. मात्र, सद्य:स्थितीत खासगी जिनिंगवरदेखील शुकशुकाट पाहायला मिळत असून, ठरावीकच शेतकरी आपला माल घेऊन येत आहेत.
कापसाच्या उत्पादनात घट होण्याची कारणे
१.यंदा जरी मोठ्या क्षेत्रावर कापसाची लागवड झाली. तरी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २५ टक्के कापसाच्या क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
२. सप्टेंबर महिन्यातच बऱ्याच भागात कपसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे शेतकऱ्यांनी सुरुवातीला आलेला माल काढून विक्री केला. जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फरदडचा माल घेतला जातो. मात्र, यंदा डिसेंबर महिन्यातच अनेक शेतकऱ्यांनी शेतातून कापूस काढून टाकला व रब्बीची तयारी केली. यामुळे यंदा क्षेत्र मोठे असूनही उत्पादनात वाढ झालेली नाही.
कोट..
यंदाच्या कापूस खरेदीचे अंदाज चुकले आहेत, सुरुवातीला शेतकऱ्यांची गर्दी पाहता यंदा उत्पादन वाढेल, अशी शक्यता होती. मात्र, अतिवृष्टी, बोंडअळीमुळे जवळपास उत्पादनावर मोठा परिणाम केला आहे. आता केवळ मोठ्या शेतकऱ्यांनीच आपला माल विक्री केलेला नाही.
-प्रदीप जैन, अध्यक्ष, खान्देश जिनिंग असोसिएशन