चाळीसगाव येथे भरड धान्य खरेदी काटापूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 13:52 IST2020-11-21T13:50:31+5:302020-11-21T13:52:53+5:30

भरडधान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ व काटापूजन झाले.

Purchase of coarse grains at Chalisgaon | चाळीसगाव येथे भरड धान्य खरेदी काटापूजन

चाळीसगाव येथे भरड धान्य खरेदी काटापूजन

ठळक मुद्देचाळीसगावच्या शेतकरी संघाला मिळाले त्यांच्याच गैरकारभाराचे फळ : आमदार मंगेश चव्हाण आमदार मंगेश चव्हाण यांची संघर्षाची भूमिकाभरडधान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ व काटापूजन

चाळीसगाव : व्यापाऱ्यांचे कल्याण करुन शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या शेतकरी सहकारी संघाला त्यांनीच केलेल्या गैरकारभाराचे फळ मिळाले आहे. यापुढेही शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भूमिका कायम असेल. तालुक्यात भ्रष्ट प्रवृत्तीला कदापि खपवून घेणार नाही, असा सूचक इशाराच आमदार मंगेश चव्हाण यांनी येथे दिला. शनिवारी त्यांच्या हस्ते करगावरोडस्थित शासकीय भरडधान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ व काटापूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
गतवर्षी चाळीसगाव शेतकरी सहकारी संघाने मका खरेदीत केलेला घोळ, त्याविषयी मंत्रालय स्तरावर केलेली तक्रार यांचा संदर्भ घेत मंगेश चव्हाण यांनी भ्रष्ट व अवैध धंद्याविरुद्धचा आपला लढाच सुरुच राहील, असेही स्पष्टपणे सांगितले.
यावेळी यावेळी भडगाव शेतकी संघाचे चेअरमन प्रताप हरी पाटील तहसीलदार अमोल मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सरदार राजपूत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, व्हाईस अरमन सुभाष पाटील, बी.वाय.चव्हाण, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील व संचालक मंडळ उपस्थित होते.
आमदार चव्हाण पुढे म्हणाले, मागील काळात शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा हमीभाव मिळण्यासाठी भ्रष्ट यंत्रणेने नाडल्याने मला शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागले. मोठ्या विश्वासाने भडगाव शेतकी संघाकडे चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याची जबाबदारी दिली गेली आहे.

'हे' दुर्दैव म्हणावे लागेल...
तीन हजार सभासद संख्या असणाऱ्या चाळीसगाव शेतकरी सहकारी संघाकडे असणारे भरडधान्य खरेदीचे काम भडगाव संघाकडे सोपविले जाणे हे दुर्दैवच म्हणावे लागेल. शेतकरी संघातील निष्क्रिय नेतृत्वाचे हे अपयश असून आमच्या महाविकास आघाडीतील स्थानिक नेतृत्वाने याकडे केलेले दुर्लक्षदेखील तेवढेच जबाबदार असल्याचा टोला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम यांनी यावेळी लगावला.

४५९ शेतकऱ्यांनी नोंदणी
शनिवारी दुपारी बारापर्यंत खरेदी केंद्रावर ४५९ शेतकऱ्यांनी भरड धान्य विक्रीसाठी नोंदणी केली आहे. ही वर्गवारी ३४३ मका, ५९ ज्वारी तर ५७ बाजरी अशी आहे. शासनातर्फे मक्याला १८५० रुपये, ज्वारीला २६२० रुपये व बाजरीला २१५० रुपये इतका हमीभाव मिळणार आहे. नोंदणी सुरू असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भडगाव शेतकी संघाच्या कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन भडगाव शेतकी संघाचे व्यवस्थापक अवधूत देशमुख, व्ही.बी.बाविस्कर, दिलीप नरवाडे यांनी केले आहे.

Web Title: Purchase of coarse grains at Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.