संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून 'कोरोना' ची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:15 AM2021-04-15T04:15:26+5:302021-04-15T04:15:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरासह जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. यामुळे खबरदारी म्हणून राज्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरासह जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. यामुळे खबरदारी म्हणून राज्य शासनाने बुधवारी रात्री ८ वाजेपासून ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाची साखळी मोडण्यासाठी राज्य शासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले असले , तरी बुधवारी संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शहरातील बाजारपेठेत तुफान गर्दी करत मनसोक्त खरेदी केली. त्यामुळे अनेक नागरिक कोरोनाच घरी घेऊन गेले असल्याची चर्चा आहे.
जिल्हा प्रशासनाने याआधीच शहरातील मुख्य बाजारपेठ भागासह जिल्हाभरात गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवेच्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने उघडण्यास बंदी करण्यात आलेली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शहरातील अनेक व्यावसायिक आपले दुकाने चोरीचोरी-चुपकेचुपके पद्धतीने सुरू ठेवत असून, बुधवारी शहरातील बाजारपेठ परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे शासकीय सुटी असल्याने सकाळी महापालिकेच्या पथकाकडून बाजारात काही प्रमाणात तपासणी करण्यात आली. तसेच काही जणांवर कारवाई देखील करण्यात आली. मात्र दुपारी बाजारात पुन्हा गर्दी झालेली आढळून आली तसेच अनेक दुकाने अर्धे शटर सुरू ठेवत सुरू होती.
फुले मार्केटसह मुख्य बाजारपेठ भागातील दुकानेही सुरूच
एकीकडे जिल्हा प्रशासनाकडून सर्व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवत कोरोनाची साखळी मोडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले जात असले, तरी शहरातील फुले मार्केटसह मुख्य बाजारपेठ परिसरात अनेक व्यावसायिक आपली दुकाने सुरू ठेवत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच या ठिकाणी कारवाईच्या भीतीने एकाच वेळी दुकानांमध्ये २० ते ३० ग्राहकांना जमा करून दुकानाचे शटर बंद करून घेतले जात आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगची मोठ्या प्रमाणात पायमल्ली होत असल्याचे ही निदर्शनास येत आहे.
दाणाबाजार परिसरासह सुभाष चौकात पायी चालण्यास जागा नाही
शहरातील दाणा बाजार परिसरात बुधवारी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तुफान गर्दीमुळे वाहनधारकांना वाहने चालवणे कठीण झाले होते तर नागरिकांना या गर्दीमधून मार्ग काढणे देखील कठीण झाले होते. प्रशासन व शासनाकडून नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात असताना बुधवारी शहरात अक्षरश: एखाद्या सणासारखी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे आढळून आले. पोलीस व मनपा प्रशासनाकडून देखील बुधवारी नागरिकांना काही अंशी सूट देण्यात आल्याचेही चित्र पहावयास मिळाले.