खान्देशात नऊ लाख क्विंटल गाठींची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:13 AM2021-01-02T04:13:47+5:302021-01-02T04:13:47+5:30
वर्ष - खरेदी - लागवड क्षेत्र २०१६ - १५ लाख गाठी - ६ लाख ८० हजार हेक्टर ...
वर्ष - खरेदी - लागवड क्षेत्र
२०१६ - १५ लाख गाठी - ६ लाख ८० हजार हेक्टर
२०१७ - १४ लाख गाठी - ६ लाख ४५ हजार
२०१८ - १५ लाख गाठी - ७ लाख २३ हजार
२०१९ - १७ लाख गाठी - ७ लाख ४९ हजार
२०२० - १६ लाख गाठींचा अंदाज... - ८ लाख हेक्टर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सीसीआय व पणन महासंघाकडून कापूस खरेदी सुरू असून, डिसेंबरअखेरपर्यंत खान्देशात मिळून नऊ लाख गाठींची खरेदी झाली असल्याची माहिती खान्देश जिनिंग असोसिएशनचे संचालक प्रदीप जैन यांनी दिली. दरवर्षी खान्देशात सरासरी १५ लाख गाठींची खरेदी होत असते. यंदा ही खरेदीत वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनात १० टक्क्यांची घट झाली असून, यंदा १६ लाख गाठींची खरेदी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
खान्देशात सुमारे आठ लाख हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते. यामध्ये जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पाच लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होते. यंदा लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यात कापसाचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे उत्पादनातदेखील मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यंदा कापसाचे लागवड क्षेत्र पाहता १८ लाख गाठींपर्यंत उत्पादन होण्याची शक्यता होती. मात्र, पावसामुळे १६ लाख गाठींपर्यंत यंदाचे उत्पादन राहण्याची शक्यता आहे.
भाव वाढतील, मात्र प्रतीक्षा मोठी
१. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा भारताच्या मालाची निर्यात वाढली असून, चीन, बांग्लादेश व व्हिएतनाम या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात सौदे झाले आहेत. गेल्यावर्षी भारताने ४६ लाख गाठींची निर्यात केली होती. यंदा भारताकडून तब्बल ६६ लाख गाठींची निर्यात होण्याची शक्यता आहे.
२. गेल्यावर्षी माल शिल्लक असल्याने टेक्सटाइल्स मार्केटमध्ये कापसाला मागणी नव्हती. यावर्षी टेक्सटाइल्स मार्केटमध्येदेखील कापसाला मागणी असण्याची शक्यता आहे. यासह यंदा अमेरिका व चीनमधील उत्पादनात मोठी घट झाली आहे. यामुळे चीनने इतर देशांकडून कापूस आयात करण्यास सुरुवात केली आहे.
३. न्यू यॅार्क वायदे बाजारात कापसाचे दर ७८ सेंटवर पोहचले आहेत. सप्टेंबर महिन्यात हे दर ६६ सेंट इतके होते. यासह चीनमधील टेक्सटाइल मार्केटसाठी दरवर्षी २ कोटी ५० लाख गाठींची आवश्यकता असते. त्यातील १ कोटी ५० लाख गाठींची गरज आपल्याच देशातून भागवत असते.
४. १ कोटी गाठींची आयात चीन करत असतो. यंदा चीनमध्येदेखील माल नसल्याने ३० लाख गाठींची आयात वाढविली आहे. त्यातच भारतातील मालाचा दर्जा चांगला व दरदेखील कमी असल्याने चीनकडून भारताच्या मालाला प्राधान्य दिले जात आहे. भविष्यात ही मागणी वाढू शकते. यामुळे त्यामुळे मार्चपर्यंत भारतात सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव जाण्याची शक्यता आहे.
खासगी व सीसीआयचे भाव सारखेच
सीसीआयने ग्रेड कमी केल्याने शासकीय खरेदी केंद्रावर कापसाला ५,६८५ इतका भाव मिळत आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची वाढती मागणी पाहता खासगी बाजारातदेखील ५,५५० ते ५,६०० पर्यंत कापसाचे भाव गेले आहेत. तसेच भविष्यात हे भाव वाढण्याची शक्यता आहे.