नाटकाचा हेतू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 03:55 PM2018-09-03T15:55:28+5:302018-09-03T15:55:57+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’साठी ‘वेध नाटकाचा’ या सदरात लिहिताहेत रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी...
कुठल्याही कार्याच्या मागे एक हेतू असतो. मग ते कार्य कोणतेही असो, लहान असो की मोठे, हेतू विरहित कार्य हे असूच शकत नाही. अपेक्षित हेतू तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा-जेव्हा अपेक्षित कार्य सिद्धीस जाते, ही बाब सर्वच बाबतीत लागू आहे. कलेच्या प्रांतातही लागू आहे. चित्रकाराला चित्र काढायचे आहे. चित्राचा विषय, आराखडा डोक्यात तयार आहे. पण हे चित्र कशासाठी काढायचे आहे हा हेतू निश्चित असला की त्याचे कार्य प्रत्यक्षात येऊ लागते. नाटकाचंही तसंच आहे.
केवळ नाटक सुचलं म्हणून ते लिहिलं ही एखादी, सुचली म्हणून कविता लिहिली इतकी सहज कृती नसते. नाटक करायचं आहे पण कशासाठी करायचं आहे, कोणासाठी करायचं आहे हा भाग तितकाच महत्त्वाचा असतो. आपण जे नाटक करणार आहोत ते हौसेपोटी शाळेच्या गॅदरींगसाठी करायचं आहे की व्यावसायिक प्रयोग करायचे की नाट्यस्पर्धेत करायचे आहे, असा वेगवेगळा असणारा हेतू महत्वाचा आहे.
१८४३ साली मराठी रंगभूमीला सुरुवात झाली असं म्हटलं जातं. या काळी नाटक करण्यामागचे केवळ मनोरंजन हा निव्वळ हेतू होता. आधीच्या काळात कीर्तन प्रवचनाद्वारे केवळ रामायण आणि महाभारत डोळ्यासमोर ठेऊन मनोरंजन केले जाई. नाटकाची सुरुवात याच पायावर झाली. सुरुवातीच्या काळात पौराणिक विषयांवर मनोरंजन होईल, अशी नाटके राजाश्रयाखाली होऊ लागली. पण अल्पावधितच राजाश्रय गेला आणि नाटक लोकानुनयी झाले. इंग्रजी वाङ््मयाच्या प्रसारामुळे नाटक केवळ पारंपरिक विषयात न अडकता ते समाज जीवनाशी कसे जोडले जाईल याचा विचार सुरू झाला आणि नाटकाचा हेतू हा मनोरंजनाकडून समाज जागृतीकडे वळले. कालांतराने भारत स्वतंत्र झाला. सगळ्याच विषयात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. पण संगीत रंगभूमीवरील संगीताच्या अतिशयोक्तीमुळे, बोलपटाच्या आक्रमणामुळे मराठी रंगभूमीला मरगळ आलेली होती ती मरगळ झटकून टाकण्यासाठी रंगभूमीला १०० वर्षे झाल्याच्या निमित्ताने शतसावत्सरिक महोत्सव झाला. यातूनच रंगभूमीला वेगळा आयाम लाभला. नाटकाचा केवळ व्यावसायिक हेतू न ठेवता नाटक जंगले पाहिजे या हेतूने हौशी रंगभूमीचा जन्म झाला. शाळा, महाविद्यालय, हौैशी नाट्यसंस्था ही अस्तित्वात आलीत व स्पर्धेच्या माध्यमातून नाटकं होऊ लागली. ते नवीन काही तरी शोधायचे या हेतूने प्रायोगिक रंगभूमीचा जन्म झाला. याच काळात लहान प्रेक्षकांसाठी नाटक करायचं या हेतूने बाल रंगभूमी उदयाला आली.
दलितांंनी आपल्यावर झालेला अन्याय मांडण्यासाठी दु:खाला वाचा फोडावी या हेतूने दलित रंगभूमी अस्तित्वात आली व कार्य करू लागली. गिरणी कामगारांनी त्यांच्या मनोरंजनाच्या हेतूने कारभार रंगभूमीचा पाया रोवला व नाटकातून केवळ मनोरंजन न करता त्या काळातील सामाजिक प्रश्नावर अत्यंत डोळसपणे विचार मांडले गेले. थोडक्यात काय तर काळानुसार, परिस्थितीनुसार नाटकाचा हेतू बदलत गेला व त्या हेतूनुसार नाटकाचा आशय, विषय, मांडणी, तंत्रज्ञान हे सारेच बदलत गेले. एकेकाळी नाटकाचा वापर हा प्रचार आणि प्रसारासाठी होता पण आज नाटकाचा हेतू काय आहे? नाटक आजही वरील कारणांसाठी तर अवश्य वापरले जाते. त्यात मनोरंजन हा तर आजही प्रधान हेतू आहे. पण आजचा महत्त्वाचा बदल म्हणजे बहिर्मुख असणारं नाटक आज प्रेक्षकांना अंतर्मुख करत आहे. केवळ समस्या, प्रश्न मांडून नाटक संपत नाही तर ते प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडत आहे. वर्षाला अनेक नाटकं प्रोड्यूस होतात त्यात अशा काही मोजक्याच कलाकृती असतात त्या विचार प्रवर्तक असतात. ज्या प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने आतला शोध घेण्यास प्रवृत्त करतात. आपण प्रेक्षक म्हणून बरंच काही बघतो. पण असं वेचक आणि निवडक, अस्वस्थ करणारं, त्रास देणारं, मनन आणि चिंतन करायला भाग पाडणारं असं काही जर रंगभूमीवर बघायला मिळालं तर आपलं अनुभवाचं विश्व खºया अर्थाने समृद्ध होत जातं हे निर्विवाद सत्य आहे.
-डॉ.हेमंत कुलकर्णी, जळगाव